नवे वर्ष आले नव्या पावलांनी…

0
3
  • मीना समुद्र

आत्मविश्वासाचे सामर्थ्य ही नवीन वर्षातली सकारात्मकता माणसाला आकर्षितही करते आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी साहाय्यकही ठरते. नावीन्यामुळे प्रसन्नतेचा छिडकावा आयुष्यावर होतो. म्हणून अत्तरगंधासारखे नवीनतेचे अस्तित्व आपल्याभोवती दरवळत राहते. कल्पकतेचे, सृजनाचे रंगही नव्यात मिसळलेले असतात, म्हणून माणसाला नवेनवे ते हवेहवेसे वाटते. नववर्षाचे उत्साही स्वागत होते ते त्यातील या नवतेमुळे, बदलामुळे आणि मनातला आशादीप प्रज्वलित झाल्यामुळे!

सागरकिनारी अस्तसमयीचं लालेलाल सूर्यबिंब पालथ्या घड्यासारखं जलरेषेला टेकतं, क्षणभर पाय जडावल्यासारखं स्थिरावतं आणि मग झरझर जळातल्या घरी निघून जातं. निरोपाच्या क्षणी पश्चिमा सोनेरी, गुलाबी, पिवळ्या, केशरी, जांभळट रंगांनी आणि रंगछटांनी रंगते. रंगांची सरमिसळ होते आणि त्याचे प्रतिबिंब जळात हिंदकळते… तेव्हा वाटते-
क्षितिजावरून सूर्यबिंब ढळले
सांजरंग पाण्यात कळवळले…
31 डिसेंबरच्या वर्षअखेरीस ही कातरता जास्त जाणवते. निरोपाची घडी अवघडच असते खरी! सूर्यास्तानंतर हळूहळू सांज दाटून येते. काळोख वाढू लागतो आणि कसलीशी हुरहुर लागून ती वेळ कातरवेळ बनून जाते. सूर्य दुसऱ्या दिवशी येणार हे माहीत असते तरीही भावना जास्त बळावते… मग आता तर 365 दिवसांचं अख्खं वर्ष संपणार असतं. दिवसेंदिवस वाढत जाणारं छोटं बाळ खूप काळानंतर पाहिल्यावर ‘अरे! हे एवढं मोठं झालं पिल्लू… कसे दिवस जातात कळत नाही’ असं आपण म्हणतो ना, तसंच हां हां म्हणता वर्ष कसं निघून गेलं कळत नाही. आणि त्या जात्या वर्षाला निरोप देताना असंख्य विचारांचं काहूर माजतं. जुन्यानव्याच्या या संधिकाळात तर ही भावना जास्त तीव्र होते. ‘बघता बघता कॅलेंडरचं शेवटचं पान उरलं अन्‌‍ कळलंच नाही हे वर्ष कसं सरलं’ असं कोणीतरी म्हणतो. ते वर्ष काही देऊन जातं, काही घेऊनही जातं; पण बरंच काही शिकवूनही जातं. जुन्या आठवणी आणि नव्या स्मृतींनी ओंजळ भरून जाते आणि मग पुन्हा उगवण्याआधी सूर्यालाही मावळावं लागतं, हा निसर्गक्रम मान्य करावा लागतो.

2024 सालाचा निरोप घेऊन आता 2025 साल उगवलं आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता येथे गोव्यात चर्चच्या घंटा, बोटींवरचे भोंगे, आगगाडीच्या शिट्ट्या यांचा एकच जल्लोष होतो. तो ऐकायची आणि फटाके, फ्लेअर्स, फुगे, दिव्यांच्या माळांनी सजलेल्या इमारती गच्चीवर जाऊन पाहण्याची आमची येथे आल्यापासूनची कित्येक वर्षांची प्रथाच! कालमानानुसार घरं बदलत गेली, संसार वाढला, माणसं नवीन भेटली, वय वाढलं, काही गोष्टी पार बदलल्या; पण नववर्षाच्या स्वागताचा उत्साह कायम राहिला… तसं पाहता प्रत्येकाचा प्रादेशिकतेप्रमाणे नववर्षारंभ वेगळा. पण 1 जानेवारीचा दिवस म्हणजे एक सार्वजनिक जागतिक उत्सवच ठरून गेला आहे. त्यामुळे या नववर्षाच्या आगमनाची प्रतीक्षा, उत्कंठा साऱ्यांनाच. त्यामुळे त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ मेजवान्या, नाचगाणी, गप्पाटप्पा हे सारं न झालं तरच नवल! त्यातून गोव्यासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात आणि बहुरंगी, बहुढंगी वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करायला देशी-विदेशी लोकांना आवडते, त्यामुळे पर्यटकांचा महापूर लोटतो. वर्षाची सुरुवात चांगली झाली, चांगल्या वातावरणात झाली की आपले नियोजित काम चांगले होणारच, अशा विश्वासाने लोक 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जात्या वर्षाला मोठ्या थाटामाटात निरोप देतात आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करतात. उत्साहाने नाताळ साजरा करून त्यांच्या स्मरणमाळेत एक नवा मणी ओवतात.

सरत्या वर्षातील स्मरणरंजन करताना ‘जरा विसावू या वळणावर’ म्हणत विसाव्याचाही अनुभव घेतात. आपण कुठून कसे आलो आणि या संसारपाशात, या दुनियादारीच्या गुंत्यात अलगद गुंतत गेलो. काही वेळा हसलो, कधी दुःख असह्य होऊन अश्रूही गाळले. काही आतुर मनाने प्रतीक्षा केली, तर क्षणात कातरही झालो. आयुष्यात एकसारखा काळ काय नेहमीच राहतो? कधी उन्हाचे चटके साहिले, कधी विसाव्यासाठी साऊली भेटली, कधी यशाचे तर कधी अपयशाचे धनी झालो. कधी सुख, तर कधी दुःख झेलले. सुखाचे दिवस झर्रकन्‌‍ निघून जातात; दुःख मात्र रेंगाळत राहते. दुःखाचा काळ पुढे सरकता सरकत नाही म्हणून ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ म्हणत आपलेच भोग भोगत राहिलो. नात्यांच्या बंधनात बांधून घेतले. संसाराच्या गुंत्यात स्वतःला गुंतवून घेतले. प्रीतीचा वर्षाव करत आणि अनुभवत सारे गोड मानून घेतले. प्रेम, दया, करुणेने जग जिंकण्याची क्षमता अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला. हा सारा तर युगायुगांचा खेळ. यात कधी हार, कधी जीत ठरलेलीच. मनासारखे दान पडले तेव्हा आनंदी झालो, स्वच्छंदी मनाने बागडू लागलो. फक्त निरोपाच्या क्षणी मात्र मनात हुरहुर माजते. कालचक्राची गती अबाधित असते. दिवस-मास येतात नि जातात. वर्षही उलटते आणि आतासारखे आपण एका नव्या वळणावर येऊन ठेपतो. त्या नव्याचे उत्साहाने स्वागतही करतो. कारण ‘गुजरे हुए पलों की परछाइयाँ बहुत है, आने वाले पलों से आरजुएँ बहुत हैं।’ अशी स्थिती असते.

नव्या वर्षाचे येणे अचानक नसते. कालचक्राची गती आपल्याला माहीत झालेली असते. तरीही आपण त्या नव्याची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने करतो. ती का? त्याच्या येण्याने उल्हास आणि आनंदाची कारंजी माणसाच्या मनात उसळू लागतात ती का? अशी कोणती जादू ते नवे वर्ष करणार असते की त्यामुळे आपले जीवन एका फुंकरीने एका क्षणात पालटणार असते? या अंतर्बाह्य पुलकिततेचे, या रोशणाईचे कारण काय असते? उल्हसित चित्रकृतीचे गमक कोणते असते?
एकतर नववर्ष हे संपूर्ण मानवी समूहाचे आरंभापासूनचे तारकचिन्ह असते आणि एकूणच मानवी मनाला नव्याचे, नावीन्याचे आकर्षण फार! त्याची अपूर्वाईही अतिशय; मग ते नावीन्य कपड्यांचे असो, वस्तूंचे असो, अलंकारांचे असो, खाद्यपदार्थांचे असो, की व्यवहार-व्यवसायाचे असो. त्याच त्या रहाटगाडग्यासारख्या फिरणाऱ्या कंटाळवाण्या आयुष्यातला बदल असतं हे नावीन्य! भूतकाळातल्या वाईट गोष्टी, अटळ दुःखद घटनाप्रसंग, आजार-अपघात विसरून जाण्यासाठी हे नवेपण फार साहाय्यक ठरते; कारण नवीन वर्षी जुन्या अनुभवांचा उपयोग करून त्यात आवश्यक ते बदल आपण घडवू शकतो. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ अशी टोकाची भूमिका न घेता जुन्यातले सोने सांभाळून ते कसे वाढवता येईल, ते थोडे हिणकस असल्यास बावनकशी कसे करता येईल याचे मार्गदर्शन त्या अनुभवावरून होऊ शकते आणि नवीन काही करण्याची उमेद मनात जागते. झालेल्या चुका टाळता येतात. हे सारे कशामुळे होते? तर मनातील आशा जागल्यामुळे. खाली पडले तरी पुन्हा नव्याने वर वर जात अतिशय तलम जाळे विणणाऱ्या कोळ्यासारखी इच्छा, जिद्द, तशी आशा या नव्या काळामुळे माणसाच्या मनात जागी होते. या आशेमुळे, तिच्या प्रकाशात आपला मार्गही त्याला दिसतो आणि आत्मतेजामुळे कर्तृत्वही झळाळून उठते.

नावीन्यातला हा हवाहवासा ताजेपणा, ही उमेद, ही जिद्द, वेगळेपण आणि आत्मविश्वासाचे जागरण हे त्यातले सौंदर्य आणि त्याचे आकर्षण वाढवितात. त्याच्या आयुष्यातला साचलेपणा, आळस, कंटाळा नाहीसा होऊन जीवनाचा प्रवाह खळाळता ठेवण्याची ऊर्मी माणसाच्या मनात जागते. त्याच्यासाठी नवीन संधीही उपलब्ध होतात, कारण प्रत्येक नवे वर्ष प्रगत अशा ज्ञानविज्ञानाद्वारे माणसाच्या संधीची अनेक दारे खुली करून देते. ‘ही’ नसेल जमत तर ‘ती’ वाट दाखवते. आत्मविश्वासाचे सामर्थ्य ही नवीन वर्षातली सकारात्मकता माणसाला आकर्षितही करते आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी साहाय्यकही ठरते. नावीन्यामुळे प्रसन्नतेचा छिडकावा आयुष्यावर होतो. म्हणून अत्तरगंधासारखे नवीनतेचे अस्तित्व आपल्याभोवती दरवळत राहते. कल्पकतेचे, सृजनाचे रंगही नव्यात मिसळलेले असतात, म्हणून माणसाला नवेनवे ते हवेहवेसे वाटते. नववर्षाचे उत्साही स्वागत होते ते त्यातील या नवतेमुळे, बदलामुळे आणि मनातला आशादीप प्रज्वलित झाल्यामुळे! माणूस आनंदी आणि प्रयत्नशील होतो तो या आशेमुळे!
नवीन वर्ष उगवले, 1 तारीख आली की तेव्हापासून लगेच सगळं काही सुरळीत होईल, ठीक होईल, आलबेल होईल असं वाटतं, पण तसं वास्तवात नसतं. विस्कटलेली घडी बसवायला, चुका सुधारायला, तोडलेले-मोडलेले सांधायला संधी मात्र नवा काळ देतो. त्यासाठी प्रत्येकाचे सातत्य आणि प्रयत्न मात्र जरूर हवेत. मनातल्या सूर्याचा आसकिरण त्याला खुणावत असतो. त्याच्या संगतीत, त्याच्या सोबतीत त्याला चालायचे असते. त्याच्या हाती हात गुंफून दूरदूरच्या प्रवासाची वाट दमदार पावले टाकीत चालायची असते- नवी स्वप्ने, नव्या आकांक्षांची कास धरून.

नवे वर्ष आले नव्या पावलांनी
खुलू द्यात स्वप्ने मनातील गाणी
अशा इच्छेने पुढे जायचे असते. गुरू ठाकूर यांनी म्हटल्याप्रमाणे मग- संकल्पांचे नवे धुमारे, पुन्हा झटकतील सारी मरगळ। चुकले त्याला अनुभव म्हणुनी, हुकले त्याला हसून टाळू। डाव तोच पण मांडू नव्याने, जोवर शिल्लक मुठीत वाळू- जीवनाचे क्षण अन्‌‍ कण जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत असे सार्थ जीवन जगत राहू.
मानवी विश्व अनेक नैसर्गिक, अनैसर्गिक आणि मानवी आघात-अपघातांनी, आपत्ती-विपत्तींनी हादरते, कोसळते, कोलमडते, पार गाडले जाते. अन्याय-अत्याचार, भ्रष्टाचार अशा अनेक अपप्रवृत्तींनी ते पोखरले आहे. स्वच्छतेपासून ते सुधारणेपर्यंत आणि विद्येपासून विकासापर्यंत अनेक आव्हाने पेलत, अनेक अनिष्टांना तोंड देत, स्वतःच्या षड्रिपूंवर मात करत, अनेक संकटांशी सामना करत मानवजातीला या नववर्षात पुढे जायचे आहे. त्यासाठी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हा तर सदासर्वदाचा सत्यसंकल्प असायला हवा. त्यासाठी श्री ज्ञानेश्वरांसारखे पसायदान वर्षारंभीच मागूया-
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात॥