नव्या लोकायुक्तांची नियुक्ती करण्यासाठी गोवा सरकारला किती वेळ लागणार आहे याचे उत्तर न्यायालयाला द्यावे, अशी सूचना काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केली. न्यायमूर्ती एम. एस. सोनक व डी. एस. नायडू यांनी काल गोवा सरकारला वरील सूचना केली.
ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी या संदर्भात केलेल्या याचिकेत, सध्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा हे येत्या १७ सप्टेंबर रोजी निवृत्त होत असताना गोवा सरकारने नव्या लोकायुक्तांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू केली नसल्याचे उच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिले आहे.
राजकीय नेते व सरकारी अधिकार्यांना भ्रष्टाचार करण्यास मोकळे रान मिळावे तसेच सध्या लोकायुक्तांकडे जे खटले आहेत ते तेथेच खितपत पडावेत, अशी सरकारची इच्छा असावी, असे याचिकादार रॉड्रिग्स यांनी याचिकेत म्हटले आहे. यावरील पुढील सुनावणी न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी मुक्रर केली आहे.