त्रिनबागोचा सलग पाचवा विजय

0
102

>> खारी पिएरची प्रभावी गोलंदाजी; फलंदाजीत डॅरेन ब्राव्हो, टिम सायफर्ट चमकले

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्रिनबागो नाईट रायडर्सने आपला विजयी धडाका सुरूच ठेवताना शुक्रवारी पहाटे झालेल्या एकतर्फी लढतीत गयाना ऍमेझॉन वॉरियर्सला ७ गडी व १० चेंडू राखून पराभूत केले. केवळ १८ धावांत ३ गडी बाद केलेला डावखुरा संथगती गोलंदाज खारी पिएर या सामनावीर ठरला. गयानाचा डाव २० षटकांत ७ बाद ११२ धावांत रोखल्यानंतर त्रिनबागोने १८.२ षटकांत केवळ ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले.

त्रिनबागोने या सामन्यासाठी संघात एक बदल करताना प्रवीण तांबेच्या जागी सिकंदर रझा याला संघात घेतले तर गयानाने ऍशमेड नेड व अँथनी ब्रँबल यांना बाहेर बसवत रोमारियो शेफर्ड व चंद्रपॉल हेमराज यांना पुन्हा संघात स्थान दिले. यापूर्वीच्या चार पैकी तीन सामन्यांत धावांचा पाठलाग करताना विजय मिळविलेल्या त्रिनबागोने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. खेळपट्टीचे संथ स्वरुप पाहून त्रिनबागोचा कर्णधार पोलार्डने एका षटकानंतर जलदगती गोलंदाज अली खान याची गोलंदाजी बंद करत सिकंदर रझा व खारी पिएर याच्या रुपात दोन्ही बाजूने फिरकी गोलंदाज लगावले. रझाने ब्रेंडन किंगला बाद केले. तर पिएरने हेमराज व निकोलस पूरन यांचा एकाच षटकात त्रिफळा उडवून गयानाची ३ बाद १२ अशी स्थिती केली. शिमरॉन हेटमायर (२३) व रॉस टेलर (२६) यांनी ३२ धावांची छोटेखानी भागीदारी रचत संघाला काही प्रमाणात संकटातून बाहेर काढले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत असताना फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करणे कठीण गेले. किमो पॉलने २६ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिल्याने गयानाला शतकी वेस ओलांडता आली. त्रिनबागोकडून पिएर व्यतिरिक्त सिकंदर रझा, कायरन पोलार्ड व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना टियोन वेबस्टर व लेंडल सिमन्स यांनी त्रिनबागोला ३४ धावांची सलामी दिली. त्रिनबागोच्या फलंदाजांनादेखील धावा जमवणे कठीण गेले. परंतु, त्यांनी आततायीपणा टाळला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ताहीरने सिमन्स (१९) व कॉलिन मन्रो (०) यांना बाद करत त्रिनबागोला सलग दोन धक्के दिले. संघाचे अर्धशतक फलकावर लागल्यानंतर वेबस्टर (२७) परतला. परंतु, यानंतर डॅरेन ब्राव्हो (२६) व टिम सायफर्ट (नाबाद ३९) यांनी अधिक पडझड होऊ न देता संघाला विजयी केले.

संक्षिप्त धावफलक
गयाना ऍमेझॉन वॉरियर्स २० षटकांत ७ बाद ११२ (हेटमायर २६, टेलर २६, पॉल नाबाद २८, शेफर्ड ११, रझा ३०-१, पिएर १८-३, पोलार्ड १५-१, ब्राव्हो २३-१) पराभूत वि. त्रिनबागो नाईट रायडर्स ः १८.२ षटकांत ३ बाद ११५ (सिमन्स १९, वेबस्टर २७, डॅरेन ब्राव्हो नाबाद २६, टिम सायफर्ट नाबाद ३९, ग्रीन १५-१, ताहीर २५-२)