– डॉ. प्रमोद पाठक, सदस्य सचिव, गोवा ऊर्जा विकास यंत्रणा
‘कलाकृती’ या संस्थेतर्फे पर्यावरणविषयक चित्रपटांचा महोत्सव आणि स्पर्धा कला अकादमी, पणजी येथे आयोजित केली होती. त्या पर्यावरणविषयक उत्सवाचा एक भाग म्हणून गोवा ऊर्जा विकास यंत्रणेने ‘कलाकृती’च्या संयुक्त विद्यमाने नव्या ऊर्जा स्त्रोतांना धरून एक निबंध स्पर्धा ८ वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेचा उद्देश शालेय स्तरावर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इ. पर्यायी ऊर्जांची केवळ माहिती करून देणे इतकाच ठेवला नव्हता, तर त्याही पुढे एक पाऊल म्हणजे त्यांच्या समोर नव्या कल्पना साकारण्याचे आव्हान ठेवणे हा होता. त्याला अनुसरून निबंधांना खालील विषय दिले होते.
पहिल्या विषयाची व्याप्ती केवळ एकाच प्रकारचा पर्यायी ऊर्जास्त्रोत लक्षात न घेता सर्वच प्रकारचे पर्यायी स्त्रोत वापरण्याच्या पद्धती लक्षात घेण्याचा होता. वार्यासंबंधात दुसरा विषय आपण वार्याला बांधू शकत नाही, पण त्यापासून कशा रीतीने मानवाला उपयुक्त अशी ऊर्जा निर्माण करता येईल यासाठी विचारांना चालना देणारा असावा अशी अपेक्षा होती.
मानवाच्या चालण्याची ऊर्जा अत्यंत कमी क्षमतेची असली तरी तेव्हा हजारो, लाखो लोक एकाच ठिकाणी ये-जा करतात, तेथे फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा समुच्चय होऊ शकतो. हा विषय देताना डोळ्यांसमोर मुंबईच्या छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानक किंवा चर्चगेट स्थानकावरून दिवसाला अक्षरशः लाखो लोकांच्या येण्या-जाण्याच्या वेळी उत्पन्न होणारी ऊर्जा कशी वापरता येईल याबाबत कल्पना असली तरी या स्पर्धेत भाग घेणारे शालेय विद्यार्थी तो विषय कसा हाताळतात ते जाणण्याची उत्सुकता होती.
वर दिलेले निबंधाचे विषय दि. २५ जून दरम्यान पक्के करण्यात येऊन लगेच ते शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था झाली. आजकाल महाजालावर (इंटरनेट) जणू सर्वच माहिती उपलब्ध असते. निबंध टंकलिखीत स्वरुपात मागितला तर तसाच्या तसा मजकूर गोळा करून पृष्ठे भरली जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन निबंध हस्तलिखित स्वरुपातच असावा असे बंधन घातले होते. त्यानुसार सुमारे १३८ निबंध निरनिराळ्या शाळांमधून मिळाले. त्यांचे परीक्षण करून १ ते ३ क्रमांक आणि ३ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी काही नव्या कल्पना, ज्या महाजालावर सहज उपलब्ध नव्हत्या आणि स्वतःच्या मांडल्या, त्यांनाच बक्षीसपात्र ठरविण्यात आले.
१ ल्या क्रमांकाचा निबंध –
हा निबंध कु. लावण्यी ज्ञानेश्वर गावस या ९ वीतील मुलीने लिहिला आहे. तिने या निबंधात वारा दंडगोलात (थळपव लूश्रळपवशी) बंदिस्त करून नंतर त्याचा उपयोग हा वाळविणे, तसेच वीज निर्माण करण्यासाठी करण्याची कल्पना मांडली आहे. परदेशात एक – दोन ठिकाणी जुन्या खाणी बंदिस्त करून पवन ऊर्जेच्या सहाय्याने त्यात हवा दाबाखाली भरून तिच्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे आराखडे केले जात आहेत. वर दिलेली कल्पना त्याच्या समांतर आहे. वारा पकडून ठेवण्यासाठी नव्या प्रकारचे यंत्र तयार करण्याची कल्पना तिने मांडली. त्यासाठी मोबाईल टॉवरसारखे उंच मनोरे बांधता येतील. यावर हे यंत्र उभारून ते चालविता येईल. एका दृष्टीने पाहिले तर अधिक उंचीवर गेल्यास वार्याचा वेग जास्त असतो, त्याचा उपयोग करून जनित्रे चालवून वीजनिर्मितीचा प्रकल्प गोव्यात आणण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत, तसेच या वापरलेल्या वार्यापासून परत त्याचा वापर करून ऊर्जा मिळविता येईल अशीही कल्पना तिने मांडली. ते करीत असताना त्यात ताजा- न वापरलेला वारा वापरावा- अशीही सूचना ती करते. मला स्वतःला लावण्यीचे कौतुक वाटले. तिने काही मूलभूत माहिती गोळा करून त्यावर आधारित नव्या कल्पना मांडल्या. आधी वापरलेल्या वार्याची ऊर्जा क्षमता कमी असेल. ती भरून काढण्यासाठी ताजा- न वापरलेला वारा त्यात मिसळावा लागेल इ. गोष्टीतून तिच्यातील सर्जनशिलता दिसून आली. तिचा हा निबंध प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरला, एवढेच नव्हे तर तिने एक छोटी कविताही लिहिली, त्यात तिच्या विचारांचे प्रतिबिंब पडले आहे. कवितेची तीन कडवी असली तरी पहिले कडवे दिले आहे –
र्जीी ाळपव हरी लशलेाश ार्रींीीश,
डे श्रशीं’ी ींहळपज्ञ ेप पर्रींीीश
डींरीीं पशु ींहळपसी ळर्पींशपींळपस
डेेप ळीं ुळश्रश्र ीींरीीं िीळपींळपस.
दुसर्या क्रमांकाचा निबंध –
हा निबंध निनाद टेंगसे या १० वीच्या विद्यार्थ्याने लिहिला आहे. ‘पारंपरिक ऊर्जा दूर सारण्याचे माझे स्वप्न’ असा या निबंधाचा विषय आहे. या निबंधात त्याने पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर मते मांडून त्याने ऍरिझोनामध्ये एका उंच मनोर्याच्या आधारे पर्यावरणातील उष्णतेच्या फरकातून वीज उत्पन्न करण्याचा प्रयोग दिला आहे. त्यापासून सुमारे १०,००० घरांना वीज मिळू शकेल. समुद्रात वार्याचा वेग जास्त असतो. तेथे पवनऊर्जा प्रकल्प लावल्यास मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण करण्याच्या शक्यतेची त्याने माहिती दिली आहे. त्याचा शेवटचा परिच्छेद हा निबंधाच्या शीर्षकाशी मेळ साधणारा आहे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा पूर्णपणे वापर करायचा असल्यास एकाच प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांवर अवलंबून राहता येणार नाही, याची त्याला जाणीव आहे. तो निबंधाच्या शेवटी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही नमूद करतो. तेव्हा निबंध कल्पना न राहता एक दिशादर्शन ठरते.
तिसर्या क्रमांकाचा निबंध –
हा निबंध जेनीन रांजेल या ९ वीतील विद्यार्थिनीने लिहीला आहे. या निबंधात तिने वार्याने हालणार्या पत्र्यांचा उपयोग करून घराघरात वापरापुरती वीज तयार करण्याची कल्पना मांडली आहे. उपकरण छोटे असल्यास १० घरांचा गट बनवून त्यांच्यासाठी उपयोगी पडेल अशी छोटी पवनयंत्रे बनविण्याची कल्पना मांडली आहे. हे पत्रे वजनाला हलके, पण मजबूत असावेत असेही तिने लिहीले आहे. त्यातून अनेक छोटी उपकरणे विद्युतभारीत करता येतील. शेवटी ती लिहिते की तिने मांडलेल्या या कल्पना वास्तवात येण्याच्या शक्यतेत आहेत किवा नाही? मला कौतुक वाटते की तिने या निबंधात संकोच न करता नव्या कल्पना मांडल्या. तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की पवनऊर्जा ही प्रदूषणविरहीत असेल याचा स्पष्ट शब्दांत निर्देश पर्यावरणाबाबत जागरुकता दाखवितो.
वरील तीन निबंधांव्यतिरिक्त तीन निबंधांना उत्तेजनपर बक्षिसे देण्यात आली. त्यातही कमी जास्त फरकाने नव्या कल्पना मांडल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा वापर कमी करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारे सध्याच्याच यंत्रणेत वाया जाणारी ऊर्जा वाचवून एकूण वापर कमी करण्याची कल्पना व त्यासाठी घराघरातून वापरण्यात येणार्या वस्तूंचा योग्य वापर यावर भर देणारा निबंध क्रेसिल्डा जॉयस कुतिन्हो या ९ वीतील विद्यार्थिनीने लिहीला आहे. तिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. खरोखरीच प्रत्यक्षात ऊर्जेचा कितीतरी अपव्यय जाणता अजाणता आपण करत असतो. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आणि त्यासाठी जनसामान्यांचे प्रशिक्षण करण्याची आवश्यकता या निबंधामुळे अधोरेखित होते.
महाजाल (इंटरनेट) हा एक भुलभुलैय्या आहे. काही विचारणा केली की जगभरात कुणी ना कुणी लिहिलेली माहिती हाताशी लागतेच. तीच घेतली आणि मजकूर म्हणून चिकटवली (कट अँड पेस्ट) असे करण्याचा मोह अनेकांना टाळता आला नाही. पेडल ऊर्जेच्या बाबतीत, तसेच सौर फलकांच्या बाबतीत शब्दशः तेच तेच परिच्छेद अनेक निबंधांमधून दिले होते. त्त्यामुळे १३८ पैकी जवळपास १२० निबंधांना विचारात घेता आले नाही. महाजालाच्या या मायाजालाला दूर कसे करावे? सर्व निबंध लेखकांचे अक्षर मात्र सुंदर, एकसारखे आणि वळणदार होते. ही निबंध स्पर्धा हा खुद्द माझ्यासाठीही एक आगळावेगळा अनुभव ठरली.