नवे आव्हान

0
127

कोरोना झाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये नंतर म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याच्या घटना देशभरात वाढू लागल्याने ती चिंतेची बाब बनली आहे. गोव्यात आजवर त्याचे सहा रुग्ण आढळले होते आणि त्यातील एकाचा बळीही गेला होता. मात्र, नुकतेच आणखी चार रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रुग्णांची संख्या दहावर गेल्याने ह्या नव्या संसर्गजन्य आजाराचे गांभीर्य निश्‍चितच वाढले आहे. राज्य सरकारनेही वेळीच ह्या नव्या आजाराची दखल घेतली, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीच स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला ही स्वागतार्ह बाब आहे, मात्र, नुसता स्वतंत्र वॉर्ड तयार करणे पुरेसे नाही. या आजारावरील औषधे देशात सहजतेने उपलब्ध नाहीत आणि अत्यंत महागही आहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी पाठपुरावा करून त्यावरील सर्व औषधांचा पुरेसा साठा गोव्याला उपलब्ध होईल हे प्राधान्याने पाहिले गेले पाहिजे. कान – नाक – घशाशी ह्या आजाराचा मुख्यत्वे संसर्ग होत असल्याने रुग्णांची एंडोस्कोपी करण्यासाठीची साधनेही लाल फितीच्या कारभारात न अडकता गोमेकॉच्या नव्या वॉर्डात लवकरात लवकर उपलब्ध करावी लागतील.
म्युकरमायकोसिस होण्याची जी कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत, त्यामध्ये कोरोनामुळे खालावलेली रोगप्रतिकारकशक्ती आणि अनियंत्रित मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच कोरोनावरील उपचारांदरम्यान सुरवातीलाच दिली गेलेली स्टिरॉईडस् यांचा समावेश आहे. आता कोरोना रुग्ण काही स्वतःहून स्टिरॉईडस् घेत नाहीत. त्यांना डॉक्टर जी औषधे सुचवतील तीच ते घेतात. त्यामुळे राज्यातील सर्व डॉक्टरांना – मग त्यात फॅमिली फिजिशियनही आले – म्युकर मायकोसिसला कारणीभूत ठरणार्‍या स्टिरॉईडस्‌च्या अतिरिक्त वापरासंबंधी सावध करणे अत्यावश्यक आहे. अनेक डॉक्टरही ह्या आजाराबाबत अनभिज्ञ आहेत असे दिसते. मधुमेह हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा भागच बनलेला आहे. सध्याच्या राज्यव्यापी संचारबंदीमुळे तर रोजच्या हालचालींवर मर्यादा आणि लोकांच्या मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकवर निर्बंध आलेले असल्याने शरीराला पुरेसा व्यायामही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे मधुमेह बळावण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची बाधा झाली तर त्यातून रुग्णाची प्रकृती खालावते आणि गुंतागुंत वाढते. अशा वेळी कोरोनातून वाचले तरी म्युकरमायकोसिसची शिकार होण्याची शक्यता बळावत असल्याने त्याबाबत पुरेशी खबरदारी सुरवातीपासून घेतली जाणे गरजेचे आहे. ह्या आजारामध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठे आहेच, परंतु अनेक रुग्णांना दृष्टीही गमवावी लागलेली आहे.
म्युकरमायकोसिसचा हा आजार कोरोनातून बरे होऊन बाहेर पडलेल्या रुग्णांमध्ये होत असल्याचे प्रामुख्याने आढळलेले आहे. आपल्या गोव्यात आजवर आढळलेल्या दहा रुग्णांपैकी केवळ एकजण कोरोनाचा सक्रिय रुग्ण आहे. इतर सर्व कोरोनातून बरे झाल्यानंतर ह्या आजारानेे बाधित झाले आहेत. जो एक रुग्ण गोव्यात म्युकरमायकोसिसने दगावला, त्याचा सीटी सिव्हिरिटी स्कोअर खालावलेला होता, त्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवल्याचे स्पष्टीकरण गोमेकॉ डीननी दिलेले आहे. त्यामुळे त्याचा थेट संबंध म्युकरमायकोसिसशी जरी जोडता येत नसला तरी देशामध्ये म्युकरमायकोसिसने रुग्ण दगावण्याचे प्रमाणही मोठे आहे ह्याचा विसर पडून चालणारे नाही.
कोरोनावरील उपचारांनंतरच्या रुग्णांच्या घ्यावयाच्या काळजीसंबंधानेही सरकारने जनतेचे योग्य प्रबोधन करणे आज गरजेचे आहे. आपण कोरोनातून वाचलो म्हणजे आपली प्रकृती पूर्वपदावर आली असे समजून बेदरकार राहिल्यानेच अशा कोरोनोत्तर म्हणजे ‘पोस्ट कोविड’ आजाराचे बळी ठरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर आलेला अशक्तपणा दूर करण्यासंदर्भात काय करायला हवे, कोणती काळजी घ्यायला हवी ह्यासंबंधी आयुर्वेदिक उपायांचे अधिकृत मार्गदर्शन रुग्णांना व्हायला हवे. आजकाल सोशल मीडियावरून कोणीही उठावे आणि कोणतेही दावे करावेत असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारच्या महामारीमध्ये भलत्या गैरसमजुती अत्यंत घातक ठरू शकतात. कोरोनाप्रमाणेच त्याच्याशी आनुषंगिक म्हणून समोर येत राहिलेल्या काळी बुरशी, पांढरी बुरशी, पिवळी बुरशी अशा म्युकरमायकोसिसच्या नवनव्या रुपांचा सामना करून रुग्णांना कसे वाचवायचे त्याचा कृतिकार्यक्रम, त्याची प्रमाणित उपचारपद्धती त्वरित आखली जावी आणि त्याचा फैलाव कसोशीने रोखावा.