नवी सकाळ मावळली

0
26

तृणमूल कॉंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आणि पक्षानेही गोवा प्रदेश कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गोव्यात पानीपत झाले आणि केवळ निवडणुकीपुरता पक्षाचा आसरा घेतलेल्या एकेका भटक्या पक्ष्याने आल्यापावली परतीचा मार्ग पत्करला. परिणामी गोव्यामध्ये ‘नवी सकाळ’ उजाडणार असल्याचे निवडणुकीपूर्वी मतदारांना कंठरवाने सांगणारा हा पक्षच येथून मावळण्याजोगी स्थिती आज निर्माण झालेली आहे. मुळात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल कॉंग्रेस पश्‍चिम बंगालबाहेर पडताना थेट गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये दाखल झाला तो या निवडणुकीत एक प्रयोग करून पाहण्यासाठीच. गाजराची पुंगी – वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असाच सारा प्रकार होता. प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी म्हणजे ‘आयपॅक’ शी पाच वर्षांचा करार झालेला असल्याने आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड उंचावलेला असल्याने आता राज्याबाहेर पडायला हवे असे तृणमूल नेतृत्वाला वाटत होते. कॉंग्रेस देशामध्ये दिवसेंदिवस गलितगात्र झालेली असल्याने तिची जागा घेण्याची मोठी संधी आहे हे दिसत होते. पश्चिम बंगालबाहेर पडल्याने दोन गोष्टी साध्य होतील – एक तर पक्षाला प्रादेशिक पक्षापासून राष्ट्रीय पक्षाचे स्थान प्राप्त करता येईल आणि दुसरे म्हणजे कॉंग्रेसची पारंपरिक मतपेढी आपल्याकडे वळवता येईल असे हे दोन आडाखे होते. प्रशांत किशोर यांनी प्रचंड आकडेमोड करून दाखवून हे केवळ फायद्याचे गणित असेल हे पक्षश्रेष्ठींना दाखवून दिले आणि गेल्या सप्टेंबरमध्ये हे सगळे बंगाली बाबू कोलकात्याहून थेट गोव्यात उतरले. आयपॅकनेही जोडीने डेरा टाकला आणि अक्षरशः भाडोत्री कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रशांत किशोर गोवा सर करायला निघाले. लुईझिन फालेरो यांच्यासारखा जुनाजाणता चेहरा पक्षापाशी आला आणि पक्षाचे निवडणुकीत काहीही हित न साधता स्वतःचा फायदा करून घेऊन राज्यसभेत पोहोचला. त्यांच्यामागून तृणमूलमध्ये प्रवेशासाठी असंतुष्टांची आणि संधिसाधूंची रांगच लागली. तृणमूलपाशी प्रचंड पैसा आहे अशी हवा झाल्याने बरीच मंडळी पक्षात घुसली आणि हे पैसे काही सहजासहजी हाती लागणार नाहीत हे लक्षात येताच बाहेरही पडली. ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली ते पक्षात राहिले, परंतु निवडणुकीत धूळधाण उडाल्याने ना त्यांची डाळ शिजू शकली, ना तृणमूलची. त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा पक्षाला गळती लागली आहे आणि ती थांबताना दिसत नाही.
प्रशांत किशोर यांना गोव्यातील पक्षाचे अंदाज चुकल्याचे उमगताच ते साळसूदपणे निवडणुकीपूर्वीच गोव्याबाहेर पडले. मुळात तृणमूलने गोव्यात भाजपविरोधकांची एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही. भाजपपेक्षाही तृणमूलने तोंडसुख घेतले ते कॉंग्रेसवर. राहुल गांधी यांच्या गोवा दौर्‍यावेळी स्वतः ममता बॅनर्जी गोव्यात होत्या, परंतु दोनापावलाच्या इंटरनॅशनल सेंटरमधील वार्तालापात त्यांनी राहुल यांच्यावरच टीकेची झोड उठवली. दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाहीत हे तेव्हाच स्पष्ट झाले. गोवा फॉरवर्डसारख्या प्रादेशिक पक्षाला जाळ्यात ओढण्याचाही तृणमूलने प्रयत्न केला, परंतु विजय सरदेसाई यांची कॉंग्रेसशी नेत्रपल्लवी सुरू असल्याने ते बधले नाहीत. गळ्याला लागला तो मगो पक्ष. तृणमूलशी हातमिळवणी करून मगोचा काय फायदा झाला? उलट झाले तर नुकसानच झाले. तृणमूलनेही मगोला जवळ करताच भाजपविरोधी ख्रिस्ती मतदारांची सहानुभूती त्यानेही गमावली. परिणामी हा भातुकलीचा संसार निवडणूक होताच मोडणार हे आधीच स्पष्ट झाले होते. निवडणूक निकाल येताच अपेक्षेनुरूप मगोने तृणमूलला टांग दिली आणि ढवळीकरांनी आपल्या मंत्रिपदाची शाश्‍वती करून घेतली. जे उमेदवार तृणमूलच्या आसर्‍याला येऊन निवडणूक लढले होते, त्यांनाही विजयश्री मिळवता न आल्याने आता त्यांची गरज संपल्याने तेही पक्षापासून दूर झाले आहेत. पुढील पाच वर्षे तृणमूलचे लोढणे गळ्यात ठेवावेसे कोणालाही वाटेनासे झालेले आहे. त्याशिवाय सत्ताधारी पक्षात शिरकाव करणे फायद्याचे ठरू शकते. त्यामुळेच तृणमूलला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग लागली आहे. आता प्रश्न आहे तो तृणमूल कॉंग्रेस पुढे काय करणार याचा. लोकसभा निवडणूक दोन वर्षांनी येते आहे. स्वतः ममता तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करण्याची आणि पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात आहेत. गोव्यात पक्ष तोवर तग धरणार की निमूट गाशा गुंडाळणार? निवडणुकीच्या तोंडावर येऊन पुन्हा हलकल्लोळ करणार की सातत्यपूर्ण कामातून आपली ओळख निर्माण करणार?