आणखी इंधन कर कपात अशक्य : मुख्यमंत्री

0
25

>> शक्यता फेटाळली; पंतप्रधानांचे ‘ते’ आवाहन दर कमी न केलेल्या राज्यांना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इंधनावरील करात आणखी घट होण्याची शक्यता काल फेटाळून लावली. राज्यात काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा होता. त्यामुळे इंधनावरील व्हॅटमध्ये आणखी कपात करून इंधन दरात घट करणे अशक्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोना आढावा बैठकीत बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना इंधन दरात कपात करण्याचे आवाहन केले होते. नोव्हेंबरमध्ये काही राज्यांनी भारत सरकारच्या भूमिकेनुसार कर कमी केला; मात्र काही राज्यांनी आपल्या राज्यातील लोकांना याचा फायदा पोहचू दिला नाही. हा त्या त्या राज्यांमधील लोकांबरोबर अन्याय आहेच. पण याचा शेजारच्या राज्यांनाही तोटा होतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ज्या राज्यांनी इंधनावरील कर कमी केला नव्हता, त्या त्या राज्यांची नावे घेऊन सदर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कर कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्यामुळे गोव्यात दर आणखी कमी होण्याचा प्रश्‍नच नव्हता, तरीही इंधन दर कमी होतील, अशी चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या, त्यावर काल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या एका प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात सहा महिन्यांपूर्वी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंधनावरील व्हॅटमध्ये आणखीन कपात करणे शक्य नाही. ज्या राज्यांनी इंधनाच्या व्हॅटमध्ये कपात केलेली नाही, त्या राज्यांना व्हॅटमध्ये कपात करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

९७ हजार कोटी द्या; पुढील
पाच वर्षे इंधन करमुक्त करू

ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. आम्ही गेल्या ३ वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपासून जनतेला दिलासा मिळावा म्हणून १५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. आमचे केंद्राकडे प्रलंबित असलेले ९७ हजार कोटी आम्हाला द्या; पुढील पाच वर्ष पेट्रोल आणि डिझेलवर कर लावणार नाही, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन करांबाबत सांगितलेली माहिती चुकीची होती. नरेंद्र मोदी राज्यांना कर कमी करायला लावत आहेत, मात्र आमचे केंद्रांकडे प्रलंबित असलेले ९७ हजार कोटी द्यावेत. त्यापैकी अर्धी रक्कम जरी दिली तरी आम्ही कर कमी करू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.