नवी सकाळ

0
16
  • सौ. शुभदा मराठे

जसजसा काळ बदलत जातो, तसतशी जीवनाची समीकरणे बदलत जातात. कालानुरूप, प्रसंगानुरूप वेगवेगळ्या जबाबदार्‍याही पेलाव्या लागतात. म्हणून त्या त्या वेळी आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.

आज सकाळी जरा लवकरच उठून चालायला गेले. उगवणार्‍या सूर्याला नमस्कार आणि साक्षी ठेवून चालायला सुरुवात केली. नुकतंच तांबडं फुटलं होतं. दोन- तीन फेर्‍या होता होता आदित्य राजांचे आगमन होऊ लागले. डोंगराआडून जसा तो वर येऊ लागला तसा अधिकाधिक दैदीप्यमान दिसू लागला.
मी उगवत्या सूर्याला रोजच पाहते. पण आजचा सूर्य मला वेगळाच भासला. जणू नवी सकाळ घेऊन आला होता तो. मला नवलच वाटले. मी विचार करू लागले. कितीतरी सकाळी आल्या असतील आणि त्यांचे मला अप्रूप वाटले असेल. पण हे सगळे आजच का आठवते कोण जाणे.
मी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. हो…
सहजच माझे लक्ष ओव्हर ब्रिजच्या भिंतीकडे गेले. दोन फुलांची नवी सकाळ. मोठ्ठे भित्तिपत्रक होते.

मी आठवू लागले.
भारतीय लष्कराने चारही बाजूंनी गोव्यावर कब्जा केला. पोर्तुगीज सैन्याला कोंडीत पकडून शरण यायला लावले. आणि पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या जुलमी राजवटीतून गोव्याला मुक्त केले तो दिवस म्हणजेच १९ डिसेंबर १९६१ची सुंदर कमलपुष्पासारखी नितळ कोमल सुगंधित सकाळ.
मुक्तीच्या सोज्वळ स्पर्शाने न्हालेली मुक्त सकाळ, नवी सकाळ. ज्यांना ज्यांना ही सकाळ पाहायला मिळाली ते खरोखरच भाग्यवान. म्हणूनच त्या मुक्त सकाळी जय हिंद, जय गोमंतकच्या घोषणांनी ही सकाळ दणाणून सोडली. गोमंतक भूमीचा कण अन् कण पुलकित झाला. ती नवी सकाळ माझ्याही आयुष्यात भाग्योदय घेऊन आली.

पाच वर्षाची होते तेव्हा मी. शाळेत जायचं वय. एका सकाळी हातातल्या पिशवीत पाटी-पेन्सिल घेऊन देवळातल्या शाळेत प्रवेश केला. माझ्यासाठी ती ज्ञानार्जनाची जणू नवी सकाळ होती.

मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर. त्यांनी पहिले महत्त्वाचे काम हाती घेतले ते म्हणजे खेडोपाडी शाळा सुरू करणे. कुठे कुणाच्या ओसरीवर तर कुठे देवळात, कुठे एखाद्या स्वच्छशा गोठ्यातही. मुलांना ज्ञानदायीनी सकाळ पाहायला मिळावी या उत्कट इच्छेने त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यासाठी ते सुसज्ज इमारतींची वाट नाही पाहत बसले.

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा… म्हणत आमच्या ज्ञानयज्ञाची सुरुवात झाली. माझ्यासारख्या मुलांच्या दारात ज्ञानगंगा आली. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाल्यावर सर्व गोमंतकीय जनतेने त्यांना मनातून स्वीकारले आणि त्यांनी ते सार्थही करून दाखवले.

पुढे १९६७ साली भाऊसाहेबांना गोवा महाराष्ट्रात विलीन करावा असे वाटले. त्यासाठी त्यांनी जनमत कौलाचा पर्याय स्वीकारला. गुलाबाचे फुल आणि दोन पाने शर्यतीत उतरली. दोन पाने गोमंतकाचे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरली. त्या दोन पानांनी विजयी होऊन गोव्याची अस्मिता, गोमंतकीयांचे वेगळेपण टिकवून ठेवण्याची कामगिरी बजावली.

हा जनमत कौल भाऊसाहेबांच्या विरुद्ध होता. तरीसुद्धा गोमंतकीय जनतेच्या भावनांचा आदर राखून त्यांनी तो स्वीकारला. गोमंतकीयांच्या वेगळ्या अस्तित्वाची भूपाळी गात ती नवी सकाळ उजाडली आणि आजतागायत आम्ही गोमंतकीयांनी ती प्राणपणाने जपली.

मध्यंतरीच्या काळात आणखी निवडणुका आल्या आणि गेल्या. सत्तांतरे झाली, बर्‍या-वाईट सकाळी आल्या नि गेल्या. काही स्मरणात राहिल्या तर काही विस्मरणात गेल्या.

जसजसा काळ बदलत जातो, तसतशी जीवनाची समीकरणे बदलत जातात. कालानुरूप, प्रसंगानुरूप वेगवेगळ्या जबाबदार्‍याही पेलाव्या लागतात. म्हणून त्या त्या वेळी आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.

कर्मधर्मसंयोगाने यावर्षीही निवडणुका आल्यात. विशेष म्हणजे ज्या दोन पानांनी गोव्याची वेगळी अस्मिता टिकवून ठेवली, त्याच दोन पानांना वेठीला धरून नकळत दोन फुले गोव्यात एक वेगळ्याच प्रकारची सकाळ आणू पाहत आहेत. गोमंतकाची वेगळी अस्मिता टिकवून ठेवण्याची जबाबदारी भूमिपुत्रांची आहे (इथून पुढे). गोमंतकीय जनता सुज्ञ आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून ती योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेईल, अस मला मनापासून वाटते.
सध्या आपली बहुमोल मते मतपेटीत बंद आहेत. आपल्याला आता १० मार्चचा निकालच खरे काय ते सांगेल. त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू या.
जय हिंद, जय गोमंतक.