स्वतःला पर्यटक म्हणवणाऱ्या एका रशियन तरुणाने केलेल्या तीन हत्या उघडकीस आल्या आहेत. आपण आणखी कितीतरी तरुणींचा अशाच पद्धतीने जीव घेतल्याचा दावाही तो करीत आहे. त्यामुळे वयाच्या तिशीतील सोळा तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून नंतर त्यांचा दुपट्ट्याने जीव घेणाऱ्या क्रूरकर्मा महानंदचा हा नवा रशियन अवतार तर नव्हे ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. महानंदने 1994 ते 2009 ह्या प्रदीर्घ काळात गरीब कुटुंबांतील तरुणींना प्रेमपाशांत ओढून आणि त्यांना लग्नाचे वचन देऊन त्यांच्याच दुपट्ट्याने त्यांचा निर्दयपणे जीव घेतला. हा जो नवा रशियन महानंद सध्या गोव्यात सापडला आहे, तो गोव्यात गेली तीन वर्षेच आहे. परंतु गोव्यात येण्यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्येही त्याने अशाच प्रकारे तरुणींच्या हत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात कसून तपास होणे गरजेचे आहे. हरमल आणि मोरजी येथे ज्या हत्या उजेडात आल्या, त्या तरुणी रशियन आहेत. त्याआधी आपण मधुस्मिता नामक आसामी तरुणीची हत्या केल्याची कबुलीही ह्या क्रूरकर्म्याने दिली आहे. ह्यातील पहिला मृतदेह जेव्हा आढळला, तेव्हाच पोलिसांनी कसून तपास केला असता तर निश्चितपणे पुढच्या दोन्ही हत्या टळू शकल्या असत्या. परंतु ते घडले नाही. त्यामुळे आत्मविश्वास दुणावून त्याने पुढील दोन हत्या केल्या. प्रेमाचे चाळे करीत तरुणींचे दोन्ही हात मागे बांधून नंतर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करीत ह्या हत्या झाल्याचे तपासात त्याने कबूल केले आहे. आपण त्यांना मोक्ष देत होतो असेही तो सांगतो आहे. म्हणजेच हा एक विकृत तरुण आहे आणि अमली पदार्थांच्या नशेत त्याने ही कृत्ये केली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ह्या प्रकरणांचा तपास केवळ खुनाच्या अंगाने नव्हे, तर अंमली पदार्थ व्यवहाराच्या अंगानेही झाला पाहिजे. ज्यांची हत्या तो करायचा, त्यांना अंमली पदार्थ पाजून त्यांना त्या नशेत ठेवून नंतर त्यांची क्रूरपणे हत्या करायचा. रशियन तरुणींच्या हत्या तर त्याने धारदार शस्त्राने गळे चिरून केल्याचे उघड झाले आहे. हे क्रौर्य अमानवी स्वरूपाचे आहे. अशा प्रकारच्या सिरियल कीलरची मालिका गोव्याला नवी नाही. अनेक तरुणींची हत्या करून संभावितपणे वावरणाऱ्या चार्ल्स शोभराजला गोव्यातच अटक झाली होती. पर्यटनाच्या बहाण्याने गोव्यात येणारी मंडळी प्रत्यक्षात येथे कशासाठी येतात, येथे काय करतात ह्याकडे सरकारची सपशेल डोळेझाक दिसते. त्याचीच परिणती म्हणून येथे ह्या परदेशी मंडळींनी स्थानिकांना हाताशी धरून व्यवसाय थाटले आहेत. किनारपट्टीच्या भागामध्ये असे व्यवसाय सर्रास दिसतात. काहींचा वर्षानुवर्षे गोव्यात मुक्काम असतो. व्हिसाची मुदत संपल्यावर देखील गोव्यात वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. हे लोक येथे का राहतात, काय करतात ह्याची कसून तपासणी सातत्याने व्हायला हवी. पर्यटनाच्या नावाने यायचे आणि येथे राजरोस अमली पदार्थांचे व्यवहार करायचे हे तर नेहमीचे झाले आहे. आजवर अमली पदार्थ व्यवहारात जे पकडले गेले आहेत, त्यामध्ये परदेशी नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. नायजेरियापासून रशियापर्यंत नाना देशांचे नागरिकत्व असलेले गुन्हेगार येथे सतत सापडत असतात. मात्र, परदेशी नागरिक असल्याने त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. विदेशी नागरिकांनी आपल्या सदनिकांमध्ये अमली पदार्थांची लागवड केल्याच्याही घटना ह्यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. गोव्याच्या रस्तोरस्ती अंधाऱ्या जागी स्प्रे गनने ज्या ग्राफिटी चितारलेल्या दिसतात त्या काही कलाकृती नसतात. अमली पदार्थ व्यवहाराच्या जागा दर्शवणाऱ्या त्या सांकेतिक खुणा असतात. पण पोलिसांच्या हे गावीही नसते. ज्या रशियन तरुणाला सध्या अटक झालेली आहे, त्याला एवढ्या सहजपणे अमली पदार्थ उपलब्ध झाले कसे? त्याचाही तपास ह्या हत्यांच्या अनुषंगाने व्हायला हवा. नुकतेच सक्तवसुली संचालनालयाने गोव्यात छापेमारी करून अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्याकडून कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. अमली पदार्थ तस्करीचे हे सूत्रधार स्थानिक पोलिसांना कसे काय ठाऊक नव्हते? आता सिरियल कीलिंगपर्यंत प्रकरण गेले आहे. गोव्याला हादरवून टाकणारी तर ही घटना आहेच, परंतु गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की करणारे हे प्रकरण आहे. गोव्याच्या पर्यटनाची सारी प्रतिष्ठा दिवसेंदिवस धुळीला मिळत चालली आहे. हडफडे अग्निकांडानंतर ही दुसरी मोठी घटना आहे, जिने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढी असुरक्षितता दिसत असताना कोणता पर्यटक गोव्यात येण्यास धजावेल? त्यामुळे सरकारने पर्यटनक्षेत्रात माजलेल्या बजबजपुरीकडे अधिक गांभीर्याने पाहावे. सरकारने ह्या हत्या प्रकरणाच्या मुळाशी तर जावेच, परंतु विदेशींचा गोव्यातील वावर तपासावा आणि त्यांना गोवा म्हणजे खुली धर्मशाळा नव्हे ह्याची जाणीव करून द्यावी.