इस्रायल – हमास युद्ध लांबत चालले असताना गेल्या आठवड्यात इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा करून ह्या संघर्षात थेट उडी घेतली असल्याने पुन्हा त्या भागामध्ये प्रादेशिक युद्धाचा भडका तर उडणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. इस्रायलकडून गेल्या एक एप्रिलला सीरियाची राजधानी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपण क्षेपणास्रांचा हा मारा केल्याचे इराणचे म्हणणे असले, तरी आजवर इस्रायल – हमास युद्धामध्ये लेबनॉनमधील हिज्बुल्ला आणि येमेनमधील हौथी बंडखोरांकडून इस्रायलवर जे सातत्याने हल्ले चढवले जात आले आहेत, त्यांची इराण आजवर जी पाठराखण करीत आला आहे तीही दुर्लक्षिण्याजोगी नाही. ह्यावेळी इराण प्रथमच स्वतः थेट ह्या रणात उतरला. गेली अनेक वर्षे इराणच्या संरक्षणविषयक तयारीबाबत मोठे प्रश्नचिन्ह जगासमोर आहे. अमेरिकेने इराणच्या संभाव्य आण्विक सज्जतेसंबंधी प्रश्न उपस्थित करून त्या देशाला नमवण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे चालवलेला असला, तरी ज्या तऱ्हेने इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्रांचा मारा झाला, ते पाहता इराणच्या संरक्षणविषयक सज्जतेत मोठी बाधा येऊ शकलेली नाही हेही ह्या हल्ल्यातून पुरेपूर स्पष्ट झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब दिसून आली ती म्हणजे इस्रायलने आपल्यावर डागली गेलेली जवळजवळ सर्व क्षेपणास्रे तत्परतेने निकामी केली. त्यासाठी अमेरिकेच्याच मदतीने विकसित केली गेलेली एरो ही क्षेपणास्रविरोधी यंत्रणा त्यांच्या कामी आली असे दिसते. हमासविरुद्धच्या युद्धाला तोंड फुटले तेव्हा हमासने गाझामधून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रांचा असाच मारा केला होता, तेव्हा सीमेवरील आयर्न डोमने त्या क्षेपणास्रांचा निकाल लावला होता. ह्यावेळी इस्रायलची ही एरो यंत्रणा एक पाऊल पुढे गेलेली पाहायला मिळाली. आपल्यावर चालून आलेली क्षेपणास्रे पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच निकामी करणारी एक्सोॲटमोस्फिअरिक क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा इस्रायलने ह्यावेळी चालीस लावल्याचे दिसून आले. इस्रायल हा सहजासहजी नमणारा देश नाही. आता इराणच्या अशा थेट हल्ल्यानंतर देखील जो कोणी आम्हाला नुकसान पोहोचवेल, त्याचे आम्ही नुकसान करू अशी रोखठोक भाषा त्या देशाचे प्रमुख बेंजामीन नेतन्याहू यांनी केलेली दिसते. अर्थात, अमेरिकेने इस्रायलच्या संरक्षणसज्जतेचे आणि ताजा क्षेपणास्र हल्ला परतवून लावण्याचे मुक्तकंठाने स्वागत केलेले असले, तरी प्रत्युत्तराच्या कारवाईला आपला पाठिंबा राहणार नाही असेही घोषित केलेले आहे व ते महत्त्वाचे आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही संयमाची वापरलेली भाषा महत्त्वाची ठरते. भारतानेही आपल्या पूर्वीच्या अलिप्ततावादी भूमिकेशी जवळीक साधताना, प्रादेशिक तणाव निवळण्याचा प्रयत्न करावा अशी भूमिका ह्यावेळी घेतली आहे, याचे कारण इस्रायल इराण यांच्यातील ह्या विवादात भारत शिया देश इराणशी असलेल्या आपल्या मैत्रीचा बळी देऊ इच्छित नाही हेच आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान उभारत असलेल्या ग्वादार बंदराला प्रत्युत्तर म्हणून भारताने इराणच्या छाबाहर बंदराचा विकास आरंभलेला आहे हे येथे उल्लेखनीय आहे. इराणने भारतीय कर्मचारी असलेले एक इस्रायली जहाज जप्त केले असले, तरी भारतीय कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहोचणार नाही ही काळजी इराण निश्चित घेईल. इस्रायलला प्रत्यक्षात प्रत्युत्तर देण्यास पाठिंबा जरी नसला तरी त्याच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काला सर्व प्रमुख राष्ट्रांनी उचलून धरले आहे. इराणच्या हल्ल्याने इस्रायल हादरून गेलेला नाही. ठोशास प्रतिठोसा लगावण्याची त्याला खुमखुमी आहे आणि हीच जगासाठी चिंतेची बाब आहे, कारण यातून प्रादेशिक संघर्ष अधिक तणावपूर्ण बनू शकतो आणि तसा तो बनणे कोणाच्याच हिताचे ठरणारे नाही. इराक इराक युद्धाचे किती भीषण परिणाम अवघ्या जगावर झाले ह्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहेच. तेलाच्या जागतिक किंमती कडाडण्यापासून आयात निर्यातीला फटका बसण्यापर्यंत कोणत्याही युद्धाची जी आर्थिक किंमत जगाला चुकवावी लागते ती जबर असते. त्यामुळेच कोणताही देश सहसा प्रत्यक्ष युद्धात उतरत नसतो. परंतु काही वेळेला संघर्षच अशा टोकाला जाऊन पोहोचतो की प्रत्यक्ष युद्धाशिवाय मग दुसरा मार्गच उरत नाही. हमासने इस्रायलवर हल्ला चढवला म्हणून इस्रायलने गाझाला भाजून काढले. त्याची परिणती म्हणून इराण समर्थित हौथी आणि हिज्बुल्लाही इस्रायलविरुद्ध युद्धात उतरले. त्याचा प्रतिशोध म्हणून इस्रायलने इराणला लक्ष्य केले आणि आता इराण प्रत्यक्ष युद्धात उतरला आहे. हे असे दुष्टचक्र असते आणि ते घातक असते. शेवटी सध्याचा हा तणाव विकोपाला जाण्यापेक्षा तो वेळीच निवळणे सर्वांच्याच हिताचे राहील.