नवा झुआरी पूलच ठरतोय वाहतूक कोंडीचे कारण!

0
20

>> पूल पाहण्यासाठी उसळतेय तोबा गर्दी; उद्घाटनाआधी वाहतूक कोंडीने गाठला कळस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवा झुआरी पूल सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी चार दिवस खुला राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या पुलावर तोबा गर्दी उसळत आहे. गेल्या ३ दिवसांत या पुलाला पर्यटकांबरोबर हजारो नागरिकांनी सहकुटुंब भेट दिली. त्यामुळे नवे झुआरी पूल लोकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे; मात्र दुसर्‍या बाजूला पूल पाहण्यासाठी येणारे हेच नागरिक आपली वाहने पणजी-मडगाव रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करून ठेवत असल्याने कुठ्ठाळीत होत असलेल्या वाहतूक कोंडीने वाहनचालक बेहाल झाले आहेत. आता नव्या झुआरी पुलाच्या उद्घाटनाची तारीख अगदी जवळ येऊन ठेपली आहे; परंतु त्याआधीच वाहतूक कोंडीचा कळस होत आहे. वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून जो पूल बांधला, तोच पूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे.

नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, गोव्यातील नागरिकांना हा अत्याधुनिक केबल स्टेड पूल पाहता यावा आणि सेल्फी, छायाचित्रे काढता यावीत, यासाठी हा पूल तूर्त नागरिकांसाठी खुला केला होता. आता नागरिकांसह पर्यटकही या पुलाला भेट देताना दिसत आहेत.

२५ ते २८ असे चार दिवस संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत खुला राहणार होता; मात्र आता बुधवारी तो सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. गेल्या तीन दिवसांत मात्र हा पूल पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आणि त्याची परिणिती वाहतूक कोंडीत झाली.

झुआरी नदीवर बराच उंचीवर अत्याधुनिक पद्धतीने बांधलेला हा केबल स्टेड पूल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यातच हा पूल पाहण्यासाठी या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आणि गर्दी कोसळली. शाळांना सध्या नाताळची सुट्टी असल्यामुळे लहान मुले आपल्या पालकांसह या पुलावर सहलीचा आनंद घेताना दिसून. तरुण-तरुणीही पुलावर सेल्फी आणि छायाचित्रे काढण्यात दंग झाल्याचे दिसून आले. संध्याकाळी सहानंतर या पुलावर तुडुंब गर्दी होते. आपली वाहने पणजी-मडगाव रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व नागरिक लहान मुलांसह पायी चालत जातात. त्यात बराच वेळ जातो.

नवा झुआरी पूल पाहण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने मुख्य रस्त्याच्या शेजारी उभी करून ठेवत असल्याने संध्याकाळच्या सत्रात कुठ्ठाळी भागात पुन्हा एकदा चक्काजाम होत असून, त्यामुळे इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. पणजीहून मडगाव, तसेच वास्को-पणजी, मडगाव-पणजीला कामावरुन आपल्या घरी जाणार्‍या लोकांना मात्र या वाहनांच्या गर्दीमुळे तासनतास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. पर्यटक आपली वाहने मिळेल, तिथे पार्क करतात तसेच वाहन पार्क करण्यासाठी जागा शोधताना इतर वाहने अडकून पडतात. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजल्यापासून कुठ्ठाळीत चक्काजाम होत आहे.
परिणामी आता केव्हाचा एकदा नवीन झुआरी पूल सुरू होतो आणि वाहतूक सुरळीत होते, याच प्रतीक्षेत सध्या वाहनचालक आहेत.

विमाने, रेल्वे चुकल्या

गोव्यातून परत जाण्याच्या तयारीत असलेल्या कित्येक पर्यटकांना सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून लागलेल्या मेगा ब्लॉकमुळे दाबोळी विमानतळ आणि मडगाव रेल्वे स्थानकावर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे त्यांना विमाने आणि रेल्वे चुकल्या आणि अनेक पर्यटक गोव्यातच अडकून पडले.

नवा झुआरी पूल आज सर्वसामान्यांसाठी बंद
नव्या झुआरी पुलाच्या एका चौपदरी भागाचे २९ डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या तयारीसाठी बुधवार दि. २८ डिसेंबरला हा पूल सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. याआधी मुख्यमंत्र्यांनी हा पूल २५ ते २८ डिसेंबरपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी खुला राहील, असे जाहीर केले होते; मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.