नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा

0
665
  • दीपा जयंत मिरींगकर
    फोंडा

आता जगभरात आलेल्या महामारीमुळे मंदिरे अगदी काही वेळासाठी उघडतात, किंवा काही तर बंदच आहेत. म्हणूनच या वर्षीच्या नवरात्रात गोव्यातील मंदिरात मखरोत्सव असणार नाही याची खंत वाटते आहे. पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे सारे नियम पाळावे लागतील.

भारतीय संस्कृतीत नऊ या शब्दाला पुष्कळ महत्त्व आहे. भारतवर्षाचे नऊ खंडात विभाजन मानले जाते. इंद्रि्‌द्वप, कसेरू, ताम्रपर्ण, नभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व, वारुण आणि सागराने वेढलेला असे हे खंड. असेच आकाशात फिरणारे आणि ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या पूर्ण जीवनावर परिणाम करणारे ग्रह/तारे नऊ आहेत. रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. प्रात:स्मरणीय अशी अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया हे नऊ नाग किंवा नागदेवता. नाथ संप्रदायात नवनाथ म्हणजे नऊ सिद्धांचा समूह. नवरत्ने म्हणजे हिरा, माणिक, मोती, इंद्रनील, पाचू, प्रवाळ, गोमेद, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोरमल्ली ही मूल्यवान रत्ने आहेत. भोजराजाच्या दरबारात धन्वंतरी, क्षपणक, अमरसिंह, शंकू, वेतालभट्ट, घटकर्परकालिदास, वराहमिहिर, आणि वररुची या नावाचे नऊ विद्वान होते आणि ते त्याला योग्य असा सल्ला देत.

एवढेच नाही तर श्रीमद् भागवत ग्रंथात भक्तीचेसुद्धा नऊ प्रकार दिले आहेत. 

‘श्रवणं, कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्, अर्चनम् वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्‌|’
आपल्या या पूर्ण समाजजीवनात नऊ या शब्दाला पुष्कळ आध्यात्मिक, सामाजिक अर्थ सापडतो.
आता सुरू होणारे नवरात्र पूर्ण भारतात विविध रूपांनी साजरे होणारे नऊ दिवस किंवा नऊ रात्रींचे नवरात्रव्रत. हा एक कुलाचार मानला जातो. पावसाळा संपून काहीशी सुखद थंडीची जाणीव होतानाच नवरात्र उत्सव सुरू होतो. या वर्षी अधिक अश्विन महिना संपून आता नीज महिना सुरू होतो आहे. अश्विन महिन्याचं मूळ नाव आहे ‘ईष’. ‘ईष म्हणजे उडून जाणे. जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा ‘ईष’ म्हणजे अश्विन मास सुरू होतो. नवरात्रोत्सव पूर्णतः निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेचं सर्वप्रथम प्रकटलेलं सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी ‘दुर्गम’ नावाच्या असुराने घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतलं. वर म्हणून त्यानं देवांच्या नाड्या आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीचं भय पसरलं. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेने आदिमायेची करुणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिने उन्मत्त दुर्गम असुर दुर्गमाचा वध केला. दुर्गम असुराचा वध करते म्हणून ही दुर्गा. त्याचा ‘दुर्ग’ म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचेच दुसरे नाव काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. प्रत्येक दिवस देवी एक रूप धारण करून येते आणि तसेच त्या रूपाचे नाव असते.
देवीची तीन रूपे म्हणजे उत्पत्ती- स्थिती- लयकारी म्हणजेच महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा. या काळात सप्तशतीचा पाठ याला विशेष महत्त्व आहे. मुख्यतः उपवास, ध्यान, जप हे नवरात्रीच्या पर्वात केले जाते.

गोव्यात पुष्कळ जुन्या घरात या पर्वात घटस्थापना किंवा वाढत्या माळा असतात. घटाबरोबर वेगवेगळी धान्ये असतात. नऊ दिवसात पाणी पडल्याने त्याचे छोटे रोप तयार होतात.
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत. या नऊ दिवसात विविध व्रते केली जातात

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी |
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ॥
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच |
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ॥
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः |
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ॥

१. ललिता पंचमी – आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात. हे काम्य व्रत असून स्त्री व पुरुषांनाही हे करता येते. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. यात एखाद्या करंड्याचे झाकण तिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात.
दुर्गानवमी – आश्विन शुद्ध नवमीस हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतयुक्त व साग्र असा ४८ दूर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसर्‍या दिवशी देवीचे विसर्जन करतात.

२. महाअष्टमी महालक्ष्मीव्रत – हे एकव्रत या दिवशी करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडशोपचारांनी पूजा करावी. देवीला सोळा प्रकारची पत्री व फुले वाहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दूर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी. तांदुळाच्या पिठाचा मुखवटा- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात. तो काजळ कुंकवाने रेखाटतात. हे काम कडक सोवळ्याने चालते. मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात. चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोरकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते. उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात. मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात. मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात. त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात. आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो. घागरी फुंकणे- नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे.

३. जोगवा मागणे – हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. मुळात जोगवा आणि भीक यात मोठा फरक आहे. कारण भीक मागणे हा नाइलाज आणि लाचारी असते तर जोगवा ही स्वत: स्वीकारलेले व्रत स्वाभिमान आणि भक्ती असते. मला तर याची तुलना समर्थ रामदास स्वामिनी रचलेले मनाचे श्लोक म्हणत भिक्षा मागणार्‍या रामदासीशी करावीशी वाटते. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. शिवाजी महाराजांनी स्वत: कवड्यांची माळ घालून जोगवा मागितल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. कवड्यासारख्या अत्यंत क्षुद्र वाटणार्‍या वस्तूला असे महत्त्व आहे की प्रत्यक्ष लक्ष्मीचे प्रतीक तिला मानले जाते. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.
परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते.
एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-

अनादी निर्गुण प्रगटली भवानी | मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥ त्रिविध तापांची कराया झाडणी | भक्तांलागुनी पावसी निर्वाणी | आईचा जोगवा जोगवा मागेन | …. या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.
लोकगीतातील नवरात्र – गोव्यातील वरेण्यपूरी म्हणजे आत्ताचे वेर्णा इथे महालसा देवीचे प्रसिद्ध मंदिर होते. पोर्तुगीज काळात ते अंत्रुज महालातील म्हार्दोळ इथे स्थलांतरित झाले. आता वेर्ण्यात भव्य असे महालसा मंदिर पुन्हा बांधले आहे. लोकगीतात आणि लोकनृत्यात नवरात्रीचा महिमा शोधताना खालील फुगडी सापडली.

‘‘अंबे मातला चंडमुंड, महिषासुर, अंबे बघोनी बघोनी कर दुरी|
अंबा नेसली नेसली पितांबर, कास नेटीची नेटीची बामणीची|
चोळी घातली घातली वरणीची, माथे भरिले भरिले फुलांनी|
पावले भरिली भरिली जोड्यांनी, कंबर बांधिल्या बांधिल्या पट्‌ट्यांनी|
गळा भरीला भरीला पुतळ्यानी, कान भरीला भरीला बुगड्यांनी|
नाक भरिले भरिले नथीनी, कान भरिले, भरिले बाल्यानी|
हात भरिले भरिले काकणांनी,बोटे भरिली भरिली अंगठ्यांनी|
भांग भरिला भरिला कुंकवानी, मुख भरिले भरिले तांबड्यापानी|
नेत्र भरिले भरिले काजळानी, हाती घेतली घेतली शस्त्रे सारी|
आईचा पदर पदर घागर्‍याचा, आईचा पलंग पलंग मोगर्‍यांचा|
आईची दिवटी दिवटी झळकली, आईची पालखी पालखी ओळखली|
आई गे चढली चढली घोड्यावर, आई गे उतरली उतरली वेर्णे|
आईने मारिला मारिला चंडमुंड, महिषासुर, आई झाली गे झाली गे महालसा॥

देवीच्या कपडे दागिने पालखी याचे वर्णन करता करता तिने महिषासुर वध केला हेही फुगडीत आले आहे.
गरबा आणि नवरात्र – नवरात्रात आजकाल सर्वत्र चालणारा गरबा खरे तर गुजराथमधून आलेला प्रकार. पण पूर्ण भारतभर आता हा पसरला आहे. एवढेच नाही तर त्याबरोबर अनेक निंद्य प्रकार, डिस्को डान्स, उघड्या पाठीचे कपडे घालून नाचणार्‍या युवती ही आपली संस्कृती नाही, तर त्या नावावरची केवळ विकृती. यावेळी कोरोनाच्या भीतीने तरी ही विकृती कमी दिसावी अशी आशा आहे.

गोव्यातील सुंदर मंदिरात मखरात बसून डोलणार्‍या देवदेवता म्हणजे नवरात्रीची पर्वणी. वेगवेगळ्या प्रख्यात बुवांची कीर्तने हीही अजून गोवेकरांच्या आवडीची गोष्ट आहे. विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध बुवांच्या कीर्तनाला आजही गर्दी असते. पौराणिक आख्यानांना आधुनिक काळाशी सांधत त्याचे मर्म शोधणारे बुवा नवरात्रीच्या पर्वात विशेष चर्चेत असतात.
आता जगभरात आलेल्या महामारीमुळे मंदिरे अगदी काही वेळासाठी उघडतात, किंवा काही तर बंदच आहेत. म्हणूनच या वर्षीच्या नवरात्रात गोव्यातील मंदिरात मखरोत्सव असणार नाही याची खंत वाटते आहे. पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे सारे नियम पाळावे लागतील.

स्त्रीशक्तीला दिलेला मान असे या सणाचे स्वरूप आहे. स्त्रीशक्तीबद्दल आदर व्यक्त करणे हे महत्त्वाचे कार्य या कृतीमागे आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीयांचा सन्मान हा महत्त्वाचा भाग आहे. सद्य परिस्थितीत याची गरज फार वाटते आहे. स्त्रीला अबला समजून तिच्यावर अन्याय करणे, जबरदस्ती करणे, तिची मानहानी करणे, तिची विटंबना करणे ही प्रवृत्ती फारच बोकाळली आहे. तिला आळा घालण्याचे काम या उत्सवामुळे झाले तर हे व्रत फलद्रूप होऊ शकेल. आपल्या संस्कृतीत स्त्रीला दिलेला सन्मान आणि आदर याचा आदर्श घेऊ शकत नसलो तर माणूस म्हणून तरी तिला समजण्याची शक्ती समाजाला देवी रूपाने द्यावी.