- – विनायक विष्णू खेडेकर
प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी सांस्कृतिक अस्मिता असते. त्यानुसार तेथील सण, उत्सव, त्यांतील विधि-विधानांचे आचरण संपन्न होते. नवरात्री व दसरा सण-उत्सव अशा रूपात भारतभर साजरे होतात. ही भारतीय संस्कृतीची एकता; तर हरएक राज्य, प्रदेश, प्रांत यांवर ठसठशीतपणे आढळणारी विभागीय मुद्रा, ही विविधता.
एवढ्याशा गोव्यातसुद्धा विभागवार अलग गति-विधी आहेत. यात सार्वजनिक व कौटुंबिक असे दोन स्तर आहेतच. त्यातही पुनः अपवाद वगळता फोंडा तालुक्यातील मदिरातून होणारी कीर्तने, मखरोत्सव, आरत्यांवेळचे खास बाजाचे, ताशा प्रमुख असलेले वाद्यवादन; यात शहनाई, सूर्त, कांसाळे, ढोलके व ताशा अशी पंचवाद्ये असतात. प्रत्येक मंदिरातील विधींचे वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करावी लागेल.
नोंदवायला हवे असे फक्त फोंडा तालुक्यातील निरीक्षण. नवरात्रीत शिरोडा गावचा रवळनाथ व प्रियोळचा बेताळ या दोन मंदिरांतील विधींचे यजमान, फर्जंद, बंदे जमातीतील गुरव आहेत, तर बाकी सर्वत्र पौरोहित्य करणारा ब्राह्मण. गोव्यात काही देवळांतून पूर्वापार चालून आलेली गुरव परंपरा खंडित झालेली असली तरी पेडण्यासह अनेक गावांतून नित्य पूजेसह घटस्थापनेपासूनचे सर्व विधी अब्राह्मण पुजारी करतो.
साधारणतः उच्च म्हटल्या गेलेल्या घरंदाज घराण्यातून घटस्थापनेची परंपरा आहे. यात दिवसागणिक चढत्या माळा, चंडीपाठ, ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका भोजन, आरत्या आहेतच. यातील एक विशेष म्हणजे अखंड तेवणारी समई. मध्ये बदलावी लागू नये म्हणून कापसाची बरीच लांब वात काठीला गुंडाळून ठेवलेली असते. चौसोपी वाड्यातून राहाणारी मुळातली सामायिक कुटुंबे विभक्त झाली, तशी हरएक कुटुंबाला क्रमाने एकेक अशी वर्षे वाटण्यात आली. आपापल्या कुवतीप्रमाणे देवकृत्ये व्हायची. कालांतराने एकेक करत शहरी स्थलांतर झालेल्यांनी परंपरा खंडित होऊ नये म्हणून गावातील एखाद्या ब्राह्मणाकडे रक्कम ठरवून कंत्राट देणे! आज बर्याच घराण्यांत ही प्रथा चालू आहे.
समाज-जीवनात रूढी, प्रथा-परंपरा, रीति-रिवाज, निष्ठा, श्रध्दा, विश्वास, भक्ती आणि भ्रमही अशा शब्दांची चलती. याची प्रौढी सांगणारेही आहेतच. यापलीकडील ‘आमच्याकडे सर्व काही शास्त्रानुसारच चालते’ अशी शेखी मिरविणारेही आहेत. आज ही सर्व माणसे एका अनिष्ट प्रथेला बळी पडत आहेत, याची गंभीर नोंद हवी. नवरात्रीतले रंग ही संकल्पना शास्त्रे, पुराणे, परंपरा- कोठेही नाही. मागील दहाएक वर्षातले हे पिल्लू बहुधा टेक्स्टाइल मिलवाल्यांनी सुरू केले असावे. महत्त्वाचे म्हणजे संस्कृत भाषेत या रंगांची नावे नाहीत. कारण त्या काळी ते रंग अस्तित्वातच नव्हते.
गोव्याचे एक वेगळेपण समजून घ्यावे असे. साधी सत्यनारायण पूजा वा कोणत्याही सण-सोहळ्याचा समारंभ, उत्सव कसा करायचा याच्या योजना त्याकडे तयार असतात. एके काळी हौशी रंगभूमी जोमात होती तेधवा नाटक करायला मिळावे म्हणून सत्यनारायण पूजेचा थाट मांडायचा. अलीकडच्या काळातच गोव्यात घुसून खेड्या-वाड्यांवर हातपाय पसरलेला ‘दांडिया’ करता यावा म्हणून दुर्गापूजेचा घाट घातला जातो आहे, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. युवती, मुलांचा सहभाग असल्याने असेल कदाचित, पण तरुणाई याकडेे आकर्षित होत असावी. दांडियाच्या कार्यशाळा, स्पर्धा यासाठी मुक्तहस्ते शासकीय आर्थिक मदत मिळते. यामुळे भविष्यकाली गोव्यातील नवरात्री आचरणात बदल होऊ शकतो.
दसरा नवरात्राला जोडून नव्हे तर चिकटून येणारा, अनेक ठिकाणी नवरात्रीचा भाग असलेला सण. भारतातील अनेक प्रांतांत उत्साहाने सादर होणारा. दसरा उत्सव दिमाखात साजरा होणारे म्हैसूर हे भारतातील प्रमुख ठिकाण. गोव्यात एकेकाळी लढवय्ये असलेले देसाई, सरदेसाई, नेत्रावळीचे प्रभुदेसाई, राणे अशा बर्याच घराण्यांत कुटुंबस्तरावर कुलपरंपरेनुसार दसरा होतो. सावई-वेरेतील सरदेसाईंच्या वाड्यात ‘खेत्र’ हा विधी होतो.
दसरा हा उत्सव म्हणून- बहुधा डोंगर भागात निवास असलेली- आपल्या वस्तीवर गोव्याला अपरिचित विधि-विधानांसह नृत्य-गायनाने साजरा करणारी धनगर ही एकमेव जमात. यावेळी विशिष्ट पद्धतीचा झगा घालून होणार्या नाचाला ‘होरबाला’ असे म्हणतात. फक्त धनगर जमातीतच आढळणार्या विशिष्ट हस्तमुद्रा ही या नाचाची खासियत आहे. पायांत खळ्ळ-खळ्ळ वाजणार्या वाक्या, डोईला खास धनगरी पगडी, त्यावर जंगली फुलांचा तुरा खोचलेला, पांढर्या रंगाच्या कपड्यावर भरतकाम वा रंगविलेला हाताचा पालथा पंजा. आकर्षक अशा या झग्याला तब्बल बारा मीटर एवढा कपडा लागतो. विधीप्र्रसंगी एखाद्या बाईच्या अंगात देवतेचा संचार होणे, तिने अडचणींची सोडवणूक करणे, दुपारी गोडा-धोडाचे खाणे; धनगरी दसरा असा साजरा होतो.
ग्रामदेवतेची पालखी सीमोल्लंघनासाठी जाणे, सोने म्हणून आपटा वा परंपरेने ठरल्या वृक्षाची पाने लुटून इतरांना वाटणे, मागाहून मंदिरातील आरती; सामान्यतः गावातील दसरा एवढाच. परंतु अनेक ठिकाणी ग्रामस्तर व मंदिरातील दसरा म्हणजे वार्षिक विधि-विधानांचा, खास करून ‘गड’ नाव प्रचलित असलेला सीमा दाळणी-बांधण्याचा विधी. तो आनंदाचा उत्सव म्हणून नव्हे, तर आत्यंतिक गंभीरतेने आचरित होतो. म्हार्दोळला श्रीमहालसेची पालखी सीमोल्लंघनासाठी डोंगरावरील मल्हारमाटी या ठिकाणी पोचताच काटकर हा सेवेकरी डोंगरमाथ्यावरील गावच्या सीमेपर्यंत जातो. सोबत नेलेला कोंबडा तेथे विधिवत पुजायचा, परंतु त्याआधी मागील वर्षी पुरलेल्या कोंबड्याचे अवशेष मिळवावे लागतात. नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, वनभोजनसम प्रसंगी देवी संचाराला जाते त्यावेळचे वाद्य-वादन नेहमीचे, सौम्य स्वरातील असते. मात्र दसराप्रसंगी केवळ चर्म व तालवाद्ये रौद्र स्वरूपात धडधडून घणघणत असतात. पालखी परत ठरल्या स्थानी पोचताच आजूबाजूच्या सर्व घरांची दारे बंद होतात. आसमंतात एक भयप्रद वातावरण असते. यावेळी बोकड बलिदान व त्या रक्तात कालविलेला चरू शिंपडला जातो तो ढोलक्याच्या ढब् ढब् नाद पसरवीत. पेडण्यातील वारखंड येथे सुळावर चढविणे या पद्धतीत एक कोहळा ठेवून एकेक ग्रामस्थ तलवार फिरवीत, मुंडके उडविल्याप्रमाणे त्या कोहळ्याच्या चकत्या उडवतो. विविध गावांतून, विभिन्न पद्धतीच्या गंभीर वातावरणात दसरा विधी होतात. वर्षभरासाठी इडा-पीडा गावात शिरू नयेत यासाठी चतुःसीमांची बांधणी हा या अशा विधींचे प्रमुख उद्दिष्ट असते.
समजू लागले, वाचता येऊ लागले तो १९४० दशकाचा काल. जीर्ण-शीर्ण झालेले एक क्रमिक पुस्तक हाती आले. त्यात वाचलेला एक धडा आजही आठवतो. सुरुवात अशी :
‘नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, मोरू, ऊठ की रे…’ अखेरीस तो मोरू जरीची टोपी घालून शिलंगणाला जातो. धड्याच्या शेवटी साकी वृत्तातील एक कविता, उद्यृत करावी अशी.
सोने लुटुनी सायंकाळी नोरू परतुनि आला,
बहीण काशी सारी येउनि ओवाळी मग त्याला|
दसरा सण मोठा| नाही आनंदा तोटा|
हे चित्र गोव्यात कोठेच दिसणार नाही. पेडण्यासारख्या प्रांतात मागाहून होणारे कौल वगैरे प्रकार सोडले तर उत्सवाचा उत्साह कोठेच आढळत नाही. म्हणून प्रादेशिक वा विभागीय संस्कृती म्हणायचे.