नवरात्रात काय काळजी घ्याल?

0
421
  • डॉ. मनाली हे. पवार
    सांतईनेज, पणजी

प्रत्येकाने स्वतः स्वतःला नियम घालून घ्यावेत. स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, सर्वांच्या हितासाठी नियमात राहून या कोरोनाच्या काळात सण साजरे करावेत. कारण नवरात्रीपासून पुढे दसरा, दिवाळी, नाताळ आहेच ना.

भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण विविध सणवार साजरे करतो. सण साजरे करणे म्हणजे आनंद पसरविणे, एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेणे, एकत्र येणे, मनातील, शरीरातील मरगळ दूर करून नव्या उमेदीने कार्य करणे, विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी आपल्या शरीर-मनातील षड्‌रिपूंचा, नकारात्मक विचारांचा नाश व्हावा व आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून आपण बरेचसे सण साजरे करतो.

नवरात्रीचा सण सध्या चालू आहे. पण कोरोनाचा महासंसर्ग अजून टळलेला नाही हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे. कोरोनाची महामारी म्हणण्यापेक्षा कोरोना संसर्गच म्हणावे. कारण आपण आता या सणावारांमध्ये योग्य काळजी घेतली नाही, नियमांचे पालन केले नाही तर मात्र हा विषाणूसंसर्ग महामारीमध्ये नक्की बदलू शकतो. म्हणूनच जरी सण असला तरी किमान ह्यावर्षीतरी हे सण साजरे करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच ह्या सणाचे थोडेसे रूप बदलले तर? कारण सणवार म्हटले की गर्दी आलीच आणि नेमके आता आपल्याला गर्दी टाळायची आहे. त्यात ही शारदीय नवरात्री म्हणजे शरद ऋतूत येणारी थंडीची सुरुवात असणारी. जंतूंची वाढही थंड हवामानात जास्त होते. म्हणून आता खरं तर आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पुराणकथांनुसार महिषासुरासारख्या अनेक राक्षसांचा नाश देवीच्या हातूनच झालेला आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजेच या कोरोनारुपी राक्षसांपासून मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवीकडे साकडं आपण नक्की घालू शकतो.

नवरात्र म्हणजे नुसता गरबा, दांडिया खेळणे नव्हे. देवीचा जागर करणे, देवीची आराधना करणे. खरंतर आपण सणांची मूळ संकल्पना विसरून बरेच व्यावहारिक झालो होतो, या संपूर्ण नवरात्रीमध्ये नुसत्या स्पर्धा करायचो. पण यावर्षी आपणा सर्वांना एक संधीच आहे. आपण या संधीचा नक्कीच लाभ घेऊया व नवरात्र खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृतीप्रमाणे शास्त्रोक्त साजरे करू या.
नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. अश्‍विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्ति वाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारुढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधि पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्तभोजन करून व्रतस्थ रहायचे असते. यावर्षी या कोरोना महामारीच्या काळात आपण प्रत्येकाने जमेल तसे व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी, व्रताच्या नावाखाली उपवासाचे वेगवेगळे पचायला जड असे पदार्थ मात्र सेवन करू नये. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करावा. सप्तशतीच्या पाठामुळे आपल्या मनात जी कोरोनाबद्दलची भीती आहे. ती नष्ट होईल. आपले मानसिक आरोग्य सुधारेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

  • अखंड नंदादीप लावावा. अखंड नंदादीप लावल्याने घरामध्ये एक प्रकारची उष्णता, ऊर्जा उत्पन्न होते. जंतूंचा संसर्ग टाळण्यासाठीही उष्णतेची गरज आहे. त्याचप्रमाणे दीप म्हणजे अंधारातून तेजाकडे जाणे. आपण ह्या काळात टीव्ही, मोबाईलवरील बातम्या, मॅसेज, व्हॉटस्‌ऍप, फेसबुक बंद करून जर दिव्यावर लक्ष केंद्रित केले तर आपली एकाग्रता वाढेल. ध्यान लागण्यास मदत होईल व नको त्या विचारांचा नायनाट होईल. दीप नेहमी अज्ञान दूर करून ज्ञानाकडे नेत असतो.
  • घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. फुले ही नेहमी सौम्य असतात. सौम्य रंग, सुगंध वातावरणात आल्हाद निर्माण करतात. तसेही या काळात पित्त वाढल्याने उष्णता जाणवते व कोरोनाच्या संसर्गामुळे थोडेसे मन खचलेले उदास आहे. अशा या काळात फुलांच्या माळा वातावरणात थोडे चैतन्य नक्कीच निर्माण करणार.

या काळात होम-हवनही करावे. तसेही या कोरोना संसर्गाच्या काळात उपाय म्हणून धूपन क्रिया सांगितली आहे. मग या धूपन क्रियेला धार्मिक आधार दिल्यास त्याचे पालन आचरण योग्य रितीने होईल. सध्या तसाही वातावरणामधील शीत गुण वाढलेला आहे. आपल्याला माहीत आहे दमट वातावरणात जंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते, अगदी कोणताही व्हायरस असूद्या धूप घालणे, होम घालणे म्हणजे थोडक्यात घरात धूर करणे. धूर घातल्याने थोडीशी उष्णता वाढते व जंतू स्थान सोडून बाहेर जातात. म्हणूनच तिन्हीसांजेला धूप घालण्याची, धुरी करण्याची पूर्वी प्रथा होती. जेव्हा गुडनाईट, ऑलआऊट इत्यादी नव्हते, तेव्हा सगळ्यांच्या घरांत धुरीच घालायचे. कमी-जास्त प्रमाणात कदाचित पद्धत वेगळी असेल. त्याने डास जे संध्याकाळी घरात शिरायचे ते सगळे पळून जात. मग कोरोना व्हायरससाठी पण अशाच प्रकारची धुरी केली तर?

  • होम करण्यासाठी औषधी द्रव्यांची काष्टे मिळतात, सध्या विकलीही जातात. ती उपलब्ध नसल्यास गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवर्‍याही चालतात. त्याही सध्या विकत मिळतात. कोणत्याही गोशाळेत त्या सहज उपलब्ध असतात. गोवर्‍या किंवा शेणी नसेल तर आपण कोकणवासी नारळ जेवणामध्ये रोजच वापरतो. त्यामुळे नारळाची करवंटी गॅसवर पेटवून त्यातूनही धूर करू शकतो. गोवरी, करवंटी पेटल्यावर त्यावर कृमीघ्न द्रव्ये घालावीत. कृमीघ्न द्रव्यांमध्ये वावडिंग, दालचिनी, करंज, काळीमिरी, तमालपत्र, आंबापत्र, कढीपत्ता, ओवा, कांद्याची साल, लसणीची साले इत्यादी यांचा समावेश होतो. यातील जे घरात उपलब्ध असेल ते निखार्‍यांवर घालावे. शेवटी आपण कितीही पुढारलेले आहोत असे वाटले तरी लहान मूल जन्माला आल्यानंतर साधारण दोन वर्षे तरी बाळाला आंघोळी नंतर ओवा, वावडिंग, लसणाची साले, कांद्याची साले, निंबाची पाने घालून धुपन करतो ते सर्दी होऊ नये म्हणून व तसेच जंतुसंसर्ग होऊ नये. घरात अशुद्ध शक्तीचा वास होऊ नये म्हणूनच ना? तसेच ज्यांच्या घरी अग्निहोत्र पात्र आहे, त्यांनी सूर्योदयावेळी व सूर्यास्तावेळी तूप व तांदूळ अग्नीवर टाकून महामृत्युंजय जप करावा.
  • देवीला नैवेद्यासाठी मधुर वेगवेगळ्या खिरी अर्पण कराव्यात तसेही या काळात साधारण पित्ताचा प्रकोपही आढळत आहे. त्यामुळे मधुर रसाने पित्ताचे शमन होण्यासाठी याचा उपयोग होतो.
    अशाप्रकारे या कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये घरातच राहून घरा-घरांमध्ये देवीची आराधना करावी. सकाळ-संध्याकाळ धूप, दीप, आरती, नैवेद्य, पूजा, मंत्रपठण, होम-हवन, पुष्प अर्पण करून भजन-कीर्तन करून नवरात्री साजरी करावी. घरातच आपल्या लोकांबरोबर दांडिया, गरबा खेळून जागरण करावे.

शक्यतो सण साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडू नयेच, तरीही बाहेर गेलात तर गर्दी करू नये. तोंड व नाक झाकेल असे उच्च प्रतीचे मास्क वापरावे. मास्क गळ्यात, अर्धे हनुवटीवर कधीच ठेवू नये. यदाकदाचित मास्कवर एखादा जंतुसंसर्ग झाला तर परत आपण जेव्हा हा मास्क तोंडावर-नाकावर घेतो, तेव्हा नाका-तोंडावाटे जंतू शरीरामध्ये प्रवेश करू शकतो, हे लक्षात ठेवावे.

  • हाता-पायांची स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची म्हणून बाहेरून घरात आल्यावर किंवा कुठल्याही धार्मिक स्थानावर गेल्यास प्रथम साबण लावून गरम पाण्याने हात-पाय स्वच्छ धुवावेत.
  • सोशल डिस्टेंसिंग पाळावे. प्रत्येकाने स्वतः स्वतःला नियम घालून घ्यावेत. प्रत्येकवेळा सरकार जबाबदारी घेऊन तुमच्या आरोग्याच्या काळजीपोटी तुम्हाला नियम सांगत बसणार नाही.
    स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, सर्वांच्या हितासाठी नियमात राहून या कोरोनाच्या काळात सण साजरे करावेत. कारण नवरात्रीपासून पुढे दसरा, दिवाळी, नाताळ आहेच ना.