नवदुर्गा

0
129

अलीकडे लक्ष्मण वर्गात वरचेवर गैरहजर राहतो. विचारले तर काहीसुद्धा बोलत नाही. ओठ घट्ट मिटून असतो. त्या दिवशीसुद्धा असेच झाले. हनुवटीवर छोटीशी दाढी ठेवून, कानाजवळचे केस वाढवून तो वर्गात येऊन बसला. परत परत सांगूनसुद्धा ऐकल्या न ऐकल्यासारखे करून तो आपल्याला पाहिजे तेच करतो. त्यामुळे त्याला सांगून सांगून माझी सहनशीलताच संपून गेली. त्याने निदान स्वतःला व्यक्त करावं यासाठी माझी चाललेली धडपडसुद्धा हळूहळू थंडावली. तरीही त्याचे असे विक्षिप्त वागणे मनातून काही जाईना. घरच्यांना एकदोन वेळा निरोप पाठवून बघितले, पण त्यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळालाच नाही. आता करायचे तरी काय, या विवंचनेत असता ठरवले, आता वाट बघणे नाही तर धडक लक्ष्मणाच्या घरीच जायचे आणि त्याच्या पालकांना त्याचे हे असे गैर वागणे जाऊन सांगावे. मनाशी हा निर्णय पक्का केला आणि जरा हायसे वाटले. डोक्यात असलेला विचार मनात आणून त्याची अंमलबजावणी करणे सहसा लगेच शक्य होत नसते. पण या क्षणी मात्र असा हलगर्जीपणा उपयोगी नव्हता.
ती भरदुपारची वेळ होती. त्या तशा उष्ण दुपारी अंगावरून घामाच्या धारा ओघळत असताना मी लक्ष्मणचे घर विचारीत विचारीत पुढे आले आणि एका झोपडीवजा घराच्या दरात उभी राहिले. आताच्या काळात त्याच्या त्या घराला घर म्हणावे का, असा प्रश्‍न मनाला पडला. मातीच्या भिंतींचा तो होता फक्त एक चौकोन. त्यावर साध्याच पत्र्यांचे छप्पर. शेणाने सारवलेली, मध्येच उखडलेली जमीन. त्या तशा जमिनीवर अंगावर मळकटलेली चड्डी अन् दोन्ही पाय पसरून, एक हात उशाखाली धरून झोपलेली व्यक्ती दिसली. तिच्या छातीच्या बरगड्यान् बरगड्या दिसत होत्या. देहाच्या मनाने मोठं पोट, काटकुळे हात-पाय, खोल गेलेले डोळे… त्यांच्या त्या अवताराकडे पाहताक्षणीच ते लक्ष्मणचे वडीलच असावे आणि दिवसरात्र दारूच्या नशेत त्यांनी स्वतःला संपवूनच टाकल्याची प्रचिती आल्याशिवाय राहिली नाही. घरात पाऊल टाकल्या-टाकल्याच घराचं घरपण लक्षात यायला वेळ लागला नाही.
लक्ष्मणच्या आईलाच मी विचारले, ‘‘लक्ष्मण कोठे आहे?’’ त्या उत्तरल्या, ‘‘हा काय आत्ताच तुमच्यापुढे आला शाळेतून.’’ मी अवाक् होऊन पाहतच राहिले. मी म्हणाले, ‘‘तो तर शाळेत आला नाही आज. आणि मध्ये मध्ये तो खूप वेळा गैरहजर राहतो म्हणून तर मी आले आहे त्याची चौकशी करायला.’’ खरंतर लक्ष्मणच्या आईसाठी हा फार मोठा धक्काच होता. माझ्या या वाक्याने तिचे डोळे भरून आले. काय बोलावे ते क्षणभर तिला सुचलेच नाही. दाटून आलेल्या हुंदक्याला गळ्यातच मिटवून टाकत त्या कातर स्वरात बोलल्या, ‘‘टिचर, मी तरी काय करू तुम्हीच सांगा. या मुलांच्या शिक्षणासाठी मी हाडाची काडं करीत आहे. दुसर्‍यांच्या घरची धुणीभांडी करते, केरकचरा काढून यांच्या पोटाची सोय करते. आता हे बघा ध्यान…’’ नवर्‍याकडे बोट दाखवून त्या म्हणाल्या, ‘‘दारू पिऊन पिऊन गटारात लोळायचे आणि दिवस ढकलायचे एवढेच काम. टिचर, माझं आयुष्यच बांधलं गेलंय या दारुड्याशी. पण या मुलांना या सर्वाची लाज वाटते. लक्ष्मण तर खूपच चिडचिड करतो. खोटं बोलतो. बाकीच्या मित्रमंडळीसारखे आपले घर नाही याची त्याला कायमच खंत वाटते. मी तरी काय करू तुम्हीच सांगा. मी खूप वेळा त्याला सांगितलं, पण तो ऐकतच नाही. तुम्हीच सांगा, मी यांच्यासाठी आणखीन काय करू? आता फक्त जीव द्यायचा तेवढा राहिलाय.’’ भरल्या डोळ्याने आणि जड जिभेने त्या बोलत होत्या. सगळ्या घरालाच अवकळेने ग्रासले होते. दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. लक्ष्मणाचे मातापिता त्याच्यावर संस्कार करीत नाहीत, त्यांना काही आपल्या मुलाचे पडलेलेच नाही, माझ्या मनातील या व इतर अनेक शंकांना लक्ष्मणाच्या घरच्या परिस्थितीने चोख उत्तर दिले होते. घरात दारुडा दादला. दोन मुलांची आई घराला जगवण्यासाठी राब राब राबतेय. मुलांना तर आपल्या परिस्थितीची लाज वाटतेय. शिक्षणाने परिस्थिती बदलायचीय असा ध्याससुद्धा नाही. मग त्या माऊलीने तरी काय करायचे? नवर्‍याचा उच्छाद सहन करायचा की मुलांचे बेताल वागणे?
लक्ष्मणाच्या घराला सतावणारी समस्या फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती प्रातिनिधिक आहे. नवर्‍याला त्याच्या व्यसनासकट स्वीकारणारी त्याची हक्काची बायको मला सर्जक शक्तिरूपीणीच भासली. तिची शक्ती, तनामनातली अभंग जिद्द घराला सावरतेय. कणखर स्वाभिमानाने जगणार्‍या स्त्रिया या मला कायम नवदुर्गाच भासत राहिल्या.