नवजात अर्भकाचा विमा का उतरवावा?

0
37
  • – शशांक मो. गुळगुळे

नवजात बालकाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. नवजात बालकांच्या उपचारपद्धतीवर फार मोठे शुल्क आकारले जाते. यासाठीच खास असलेली आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी लागते.

मूल जन्माला येताना हल्ली अडचणी निर्माण होण्याचे प्रकार बरेच वाढले आहेत. परिणामी हॉस्पिटलचे बिल बरेच फुगते. यातून दिलासा मिळावा म्हणून नवजात अर्भकाचा आरोग्य विमा उतरविणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. नवजात बालकाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण भारतात फार मोठ्या प्रमाणावर आहे. नवजात बालकांच्या उपचारपद्धतीवर फार मोठे शुल्क आकारले जाते. नेहमीच्या आरोग्य विमा योजनांत नवजात अर्भकांवर होणारा खर्च देण्याचा ‘क्लॉज’ समाविष्ट नसतो; यासाठीच खास असलेली आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी लागते. पण यासाठी बर्‍याच सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या बर्‍याच प्रकारच्या पॉलिसी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यांपैकी योग्य पॉलिसी निवडणे ही पॉलिसी विकत घेणार्‍याची जबाबदारी ठरते. यासाठी म्हणजेच नवजात अर्भकाच्या आजारपणाचे ‘रिस्क कव्हर’ होण्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी. एखाद्याने जर नवजात अर्भकासाठी आरोग्य विमा पॉलिसीचे संरक्षण घेतले तर त्यामुळे त्या नवजात अर्भकावर योग्य उपचार होऊ शकतात. सर्वांच्याच बाबतीत नाही पण बर्‍याच जणांच्या बाबतीत आयत्या वेळेला पैसा कुठून आणायचा? कुठून उभारायचा? हा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. नवजात अर्भक जन्मतःच शरीर-प्रकृतीने ठीकठाक असावे असे प्रत्येक जन्मदात्याला वाटते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही तर आरोग्य विमा पॉलिसी फार मोठा आधार ठरू शकते.
काही विमा पॉलिसीत नवजात अर्भकाच्या उपचारपद्धतीचा खर्च समाविष्ट असतो, काही पॉलिसींत पर्यायी असतो. जर विमा उतरविणार्‍याने पर्याय स्वीकारला तर तो समाविष्ट केला जातो. पॉलिसीतच जर यासंबंधीचा ‘क्लॉज’ समाविष्ट असेल तर ‘प्रिमियम’ कमी आकारला जातो व हा ‘क्लॉज’ मुद्दाम समाविष्ट करून घेतला तर मात्र ‘प्रिमियम’ची रक्कम जास्त आकारली जाते. प्रसूतीसाठी होणारा खर्च बहुतेक पॉलिसीत समाविष्ट नसतो; काही विशिष्ट पॉलिसींतच हा खर्च समाविष्ट असतो. हा खर्च समाविष्ट असणार्‍या पॉलिसींचे प्रमाण फार कमी आहे.
नवजात अर्भकासाठी विम्याची सोय
ज्या कंपन्यांच्या पॉलिसींत प्रसूतीच्या खर्चावर विमा संरक्षण मिळते, अशा पॉलिसीत नवजात अर्भकासाठीचे विमा संरक्षण अतिरिक्त फायदा म्हणून समाविष्ट केले जाते. काही काही पॉलिसींत जर आईचा प्रसूतीसाठीचा विमा उतरविलेला असेल तरच नवजात अर्भकाचा विमा उतरविला जातो.
थांबायचा कालावधी
गर्भारणाचा कालावधी व प्रसूती यासाठीचे संरक्षण देणार्‍या पॉलिसींत बर्‍याच अटी व नियम असतात व बर्‍याच प्रकरणात या अटींवर व नियमांवर बोट ठेवून विम्याचे दावे नामंजूरही केले जातात, याचे भान ठेवून योग्य विमा पॉलिसी विकत घ्यावी म्हणजे नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही. प्रसूती व नवजात अर्भकाच्या उपचारपद्धतीचा खर्च काही काही पॉलिसींत, पॉलिसी विकत घेतलेल्या तारखेपासून मिळत नाही. यासाठी थांबायचा कालावधी (वेटिंग पिरियड) आखून दिलेला असतो. पॉलिसी विकत घेण्यापूर्वी हा कालावधी किती दिवसांचा आहे याची माहिती करून घ्यावी, नाहीतर हा क्लॉज अडचण निर्माण करू शकतो. परिणामी दावा असंमत होऊ शकतो. काही काही पॉलिसींत पॉलिसीधारकाने जर अतिरिक्त ‘प्रिमियम’ भरला तर ‘वेटिंग पिरियड’चा क्लॉज समाविष्ट केला जात नाही. हा एक पॉलिसी विकत घेणार्‍यासाठी ‘वेटिंग पिरियड’च्या जाचातून सुटण्याचा चांगला पर्याय आहे किंवा ज्या पॉलिसीचा ‘वेटिंग पिरियड’ कमी आहे अशी पॉलिसी विकत घेण्याचाही प्रस्ताव आहे.
नवजात मुलांसाठी विमा संरक्षण
जन्मलेले मूल (जस्ट बॉर्न) व नवीन जन्माला आलेले मूल (न्यू बॉर्न बेबी) या विमा संरक्षणात फरक असतो. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला काही पॉलिसींत ते जन्मलेल्या दिवसापासून ९० दिवसांपर्यंत विमा संरक्षण हे प्रसूती विमा पॉलिसीचा एक भाग म्हणून मिळते. सर्व पॉलिसींत ही तरतूद नसते. त्यामुळे अशी तरतूद असलेली पॉलिसी निवडण्याचा पर्याय पॉलिसी विकत घेणार्‍याला उपलब्ध असतो. काही पॉलिसींत अशा प्रकारचा दावा संमत करताना ठरावीक कमाल रक्कमच दिली जाते. कमाल किती रक्कम द्यायची हे पॉलिसी क्लॉजमध्ये समाविष्ट केलेले असते. रक्कम देण्यावर ‘कॅपिंग’ असते. काही विमा कंपन्या ज्या रकमेची पॉलिसी उतरविली आहे त्या तारखेचा काही टक्के हिस्सा अशा या उपचारपद्धतीवर देतात.
नवीन जन्मास आलेल्याला विमा संरक्षण
९१ दिवसांच्या अर्भकापासून ते १८० दिवसांचे अर्भक या प्रकारात समाविष्ट होतात. काही विमा कंपन्या अगोदर जर पॉलिसी काढली असेल तर पॉलिसी सुरू करण्याच्या कालावधीत नवीन जन्माला आलेल्या मुलाला पॉलिसीत समाविष्ट करून घेतात. तशी ‘एन्डॉर्समेन्ट’ पॉलिसीत पॉलिसीधारकाकडून अतिरिक्त प्रिमियम घेऊन करतात. पण पॉलिसीत अशी ‘एन्डॉर्समेन्ट’ करताना ते लहान मूल आजारी असता कामा नये. मूल आजारी झाल्यावर फायदा मिळावा म्हणून ‘एन्डॉर्समेन्ट’ करून घेता येत नाही. काही विमा कंपन्या फक्त पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळीच अशा मुलांना विमा संरक्षण देतात, मध्ये देत नाहीत.
संरक्ष
नवीन बालकांसाठीची चांगली आरोग्य विमा पॉलिसी जन्माला येण्यापूर्वीचा व जन्मानंतरचा दोन्ही वेळच्या उपचाराच्या खर्चांचा दावा संमत करते. यात प्रसूती प्रक्रियेचा खर्च, जन्माच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्यास त्याचा खर्च, तसेच शिशूचे केले जाणारे लसीकरण या सर्व खर्चांचा परतावा दावा करून मिळविता येऊ शकतो. शिशूंच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांचे बर्‍याच प्रकारचे लसीकरण करून घ्यावे लागते. हे लसीकरण करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर कोणत्याही पालकाने ठरलेल्या तारखेस बाळाचे लसीकरण करून घेतले नाही व लसीकरण न केल्यामुळे त्या बाळाला जर एखादा आजार जडला तर ती पालकांची अक्षम्य चूक समजण्यात येते व उपचारपद्धतीच्या खर्चाचा दावा नामंजूर केला जातो. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या लसीकरणाचे वेळापत्रक अचूक पाळायलाच हवे, हे त्यांच्या व त्यांच्या बाळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
दावा कशाचा मिळत नाही
बालकाला जर जन्मजात बाह्य अवयवांशी संबंधित आजार असेल तर याचा दावा या प्रकारच्या पॉलिसीत नामंजूर होऊ शकतो. पण शरीराच्या आतील भागात जर काही जन्मजात दोष असेल तर त्यावरील उपचारपद्धतीचा खर्च मंजूर होऊ शकतो.
या पॉलिसीत कित्येक प्रकारचे आजार/कित्येक प्रकारची उपचारपद्धती ही ‘एक्सल्युजन क्लॉज’मध्ये समाविष्ट केलेली असते. या ‘एक्सक्लुजन क्लॉज’मध्ये समाविष्ट असणार्‍या आजारांचा खर्च स्वतः करावा लागतो.
तुमच्या अर्भकासाठी योग्य पॉलिसी निवडणे हे आव्हानात्मक असते. बाजारात अशा प्रकारच्या एवढ्या पॉलिसी उपलब्ध आहेत, त्यांपैकी सर्वात जास्त फायदा देऊ शकणारी पॉलिसी ठरविणे तितकेसे सोपे नाही. कमी ‘प्रिमियम’मध्ये जास्तीत जास्त ‘कव्हरेज’/संरक्षण देणारी व कडक अटी/नियम नसणारी पॉलिसी निवडावी. समजा पॉलिसी निवडल्यानंतर असे लक्षात आले की, आपण चुकीची पॉलिसी निवडली आहे तर आरोग्य विमा पॉलिसींबाबत ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा उपलब्ध आहे. पॉलिसीतले नियम व अटींचे क्लॉज पूर्ण अभ्यासल्याशिवाय कोणतीही पॉलिसी विकत घेऊ नये. समजा चांगली पॉलिसी विकत घेण्यासाठी ‘प्रिमियम’ जास्त भरावा लागला तर त्या ‘प्रिमियम’वर आयकर सवलत मिळतेच हा एक अतिरिक्त फायदा आहे.