>> मंत्री सरदेसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सध्या अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या कोळसा वाहतूक व नद्यांचे राष्ट्रीयीकरण या प्रश्नांवर चालू अधिवेशनात व्यापक अशी चर्चा घडवून आणावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे, असे नगर आणि नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले.
नद्यांचे राष्ट्रीयीकरण व कोळसा वाहतूक हे प्रश्न सध्या वादाचा विषय ठरले आहेत. राज्यातील जनतेला या प्रश्नांबाबत चिंता आहे असे चित्र सध्या सर्वत्र दिसत असून या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे वरील मागणी केली आहे, असे सरदेसाई म्हणाले.
आपण स्वतः तसेच आपल्या पक्षाचे अन्य दोन आमदारही मंत्री आहेत. त्यामुळे आम्ही विधानसभेत वरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी अशी सभागृहात मागणी करू शकत नाही. त्यामुळे आपण बुधवारी पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी वरील मागणी केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.