नजर पदकांवर

0
17

फॅशनच्या दुनियेची जागतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पॅरिसनगरीमध्ये गेल्या आठवड्याअखेरीपासून क्रीडाक्षेत्रातील सर्वांत जुन्या आणि सर्वोच्च मानाच्या अशा ऑलिम्पिक महास्पर्धेस प्रारंभ झाला आहे. क्रिकेट आणि फुटबॉल आणि फार तर टेनिसखेरीज अन्य क्रीडाप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची जगभरात सार्वत्रिक प्रवृत्ती जरी असली, तरी दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा क्रीडाचाहत्यांचे लक्ष निश्चितच वेधून घेत असतात. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी दाखवलेल्या चमकदार कामगिरीमुळे तर यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावलेल्या आहेत. गेल्यावेळी 2020 मधील जपानमधील ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतीय खेळाडू एका सुवर्णपदकासह सात पदके मिळवून परतले होते, तेव्हा देशाने जल्लोष केला होता. यंदा यापुढील पंधरा दिवस आपल्या 112 खेळाडूंचे जंगी पथक सोळा क्रीडाप्रकारांतील 69 स्पर्धांमध्ये पदकांसाठी झुंजणार आहे. टोकियोमधील आपला पदकांचा विक्रम मोडून काढण्यात त्यांना यश मिळणार का याची देशाला म्हणूनच उत्सुकता आहे. मनू भाकरने नेमबाजीत ऐतिहासिक कांस्य पदक मिळवून भारताचे खाते उघडले आहे. तब्बल 29 सदस्य असलेला आपला ॲथलेटिक्स संघ असो किंवा 21 सदस्य असलेले शूटिंग स्कॉड असो, भारताने यावेळी ऑलिम्पिकमधील पदकतालिकेतील आपले स्थान उंचावण्याची जंगी तयारी केलेली स्पष्ट दिसते. आपला नीरज चोप्रा यावेळी पुन्हा एकवार पुरुषांच्या भालाफेकीत स्वतःचे आणि देशाचे भाग्य आजमावणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनमध्ये पुन्हा चमक दाखवू पाहते आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक हस्तगत करणारी मीराबाई चानू येत्या सात ऑगस्टला वजन उचलण्याच्या स्पर्धेत 49 किलो गटामध्ये पदक मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आपली बॉक्सर लवलिना बोर्गोहेन त्या क्रीडाप्रकारात पदक प्राप्त करण्याची शिकस्त करील. दोन वेळा विश्वविजेती राहिलेली निखत झरीन यंदा प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत उतरलेली आहे. तिच्याकडूनही देशाच्या अपेक्षा आहेत. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, गोल्फ,हॉकी, ज्युदो, रोईंग, सेलिंग, शूटिंग, पोहणे, कुस्ती, टेबलटेनिस
आणि टेनिस अशा सोळा खेळांमध्ये भारतीय खेळाडू यावेळी पदकांसाठी लढणार आहेत. त्यापैकी किमान आठ क्रीडाप्रकारांमध्ये भारताला पदकांची आशा आहे. भालाफेकीत नीरज चोप्रा, महिला बॅडमिंटन एकेरीत पी. व्ही. सिंधूप्रमाणेच, बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी, कुस्तीपटू अमन सेहरावत, बॉक्सिंगची राणी निखत, शूटिंगमध्ये सिफ्त कौर सामरा आपले आणि देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारतीय हॉकी टीमकडूनही यावेळी यशाची अपेक्षा आहे. यंदा सरकारने आणि कॉर्पोरेट जगतानेही आपल्या ऑलिम्पिक खेळाडूंना मोठे पाठबळ दिल्याचे पाहायला मिळते. एका कॉर्पोरेट हाऊसतर्फे पॅरिसमध्ये प्रथमच खास ‘इंडिया हाऊस’ साकारले गेले आहे, जेथे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडवले जाणार आहे. सर्व खेळांचे लाईव्ह स्ट्रिमिंगही केले जाते आहे. त्यामुळे देशातील युवा खेळाडूंमध्ये क्रिकेट, फुटबॉल सोडून इतर क्रीडाप्रकारांविषयीही उत्सुकता निर्माण होईल आणि त्यांना त्यात उतरण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. आपला एकशे चाळीस कोटींचा हा विशाल देश आहे. येथे प्रतिभेची कमी नाही. मात्र, ह्या प्रतिभेला वाव देणाऱ्या सोयीसुविधा देण्यात आपण आजवर कमी पडलो आहोत. हळूहळू हे चित्र बदलते आहे. येथेही आपल्या खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने अजूनही राजकीय मंडळींनीच सर्व क्रीडा संघटनांचे नेतृत्व आपल्या हाती धरून ठेवलेले आहे. ह्या कचाट्यातून क्रीडा संघटनांची मुक्तता करण्याची नितांत आवश्यकता आहे. देशहित समोर ठेवून राजकारण्यांनी विविध क्रीडाप्रकारांच्या उत्कर्षासाठी निरपेक्ष भावनेने प्रयत्नरत राहणे जरूरीचे आहे, तरच आपल्या क्रीडाप्रतिभेला संधी आणि वाव मिळू शकेल. 2036 ची ऑलिम्पिक्स स्पर्धा भारतात भरवण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी देशासमोर ठेवले आहे. मात्र, केवळ आयोजनापुरता त्यात भारताचा सहभाग न राहता अधिकाधिक क्रीडाप्रकारांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरले तरच त्या आयोजनाला काही अर्थ राहील, कारण ऑलिम्पिकसारख्या खर्चिक आयोजनात देशाने करदात्यांचा पैसा व्यर्थ वाया घालवू नये असा सूर लावणाऱ्यांचीही आपल्या देशात कमी नाही. पण सन 2047 पर्यंत देशाला विकसित बनवून जगातील पहिल्या पाच देशांत भारताचा समावेश करण्याचे जे स्वप्न देशापुढे ठेवले गेले आहे, त्याचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले गेले पाहिजे यात शंका नाही.