गोवा सरकारने नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मानधनात जवळपास 100 टक्के वाढ करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या महापौरांचे मानधन 12,875 रुपयांवरून 25,000 रुपये, अ वर्ग नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचे मानधन 11,475 रुपयांवरून 22,200 रुपये, तर क वर्ग नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचे मानधन 10,800 वरून 20,000 रुपये करण्यात आले आहे. सर्व वर्गातील नगरपालिकांच्या नगरसेवकांचे मानधन 18,000 रुपये करण्यात आले आहे.
नगरविकास खात्याने गेल्या 16 मे रोजी नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मानधनात बदल सुचविणारी मसुदा अधिसूचना जारी केली होती आणि मसुदा अधिसूचनेवर 15 दिवसांत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्याने मानधन वाढ अधिसूचित करण्यात आली आहे.