फोंड्यासाठी रितेश नाईक, तर साखळीसाठी रश्मी देसाई यांचे नाव चर्चेत
फोंडा आणि साखळी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड येत्या मंगळवार दि. 16 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी काल दिली.
गेल्या 5 मे रोजी या दोन्ही नगरपालिका मंडळासाठी निवडणूक होऊन 7 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. या दोन्ही पालिकांवर भाजपने सत्ता मिळवण्यात यश प्राप्त केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साखळी नगरपालिकेमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले, तर फोंडा नगरपालिकेत कृषीमंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कृत गटाने बहुमत प्राप्त केले. साखळी नगरपालिकेमध्ये एकूण 12 पैकी भाजप पुरस्कृत 11 उमेदवार निवडून आले, तर फोंडा नगरपालिकेत एकूण 15 पैकी भाजप पुरस्कृत 10 उमेदवार निवडून आले. रायझिंग फोंडा पुरस्कृत 4 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला.
साखळीचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव
साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. साखळीच्या नगराध्यक्षपदी प्रभाग 4 मधून निवडून आलेल्या रश्मी देसाई यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखळी नगरपालिकेमध्ये गेली कित्येक वर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या धर्मेश सगलानी यांचा पराभव करून रश्मी देसाई निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नाव अधिक चर्चेत आहे. 12 पैकी भाजप पुरस्कृत 11 उमेदवार निवडून आल्याने आगामी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाची बिनविरोध निवड होणार आहे. विरोधी गटातून केवळ एकमेव नगरसेवक निवडून आला आहे.
फोंड्यात रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी फेरनिवड शक्य
फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोंडा पालिका निवडणुकीत भाजपने समर्थन दिलेले 10 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश आणि रॉय नाईक यांचा समावेश आहे. फोंडा पालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायझिंग फोंडा गटाचे नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
फोंडा नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखालील रायझिंग फोंडा गटाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी काल भेट घेतली. फोंडा नगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी रायझिंग फोंडा गटाला सहकार्य करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी केतन भाटीकर यांच्यासोबत नगरसेविका गीताली तळावलीकर, शिवानंद सावंत, प्रतीक्षा नाईक, वेदिका वळवईकर, अपक्ष नगरसेवक व्यंकटेश नाईक यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पाच नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
केले.
अर्जांसाठी 15 मेपर्यंत मुदत
दोन्ही पालिकांच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांसाठी येत्या 15 मे रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. येत्या 18 आणि 19 मे रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी जीपार्डमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे नगरपालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी सांगितले.