>> नगरविकासमंत्री राणे यांची नगरविकास खात्याच्या अधिकार्यांना सूचना
नगरविकास खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी काल खात्याच्या अधिकार्यांची एक बैठक घेऊन त्यांना नगरपालिकांच्या कामात सुसूत्रता आणण्याबरोबरच जन्म व मृत्यू दाखले आणि व्यापार परवाने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याचबरोबर नगरपालिकांना त्यांनी केलेल्या खर्चांचे वेळोवेळी लेखापरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
पावसाळा असल्याने डासांमुळे होणारे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या आदी रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांच्या मदतीने आवश्यक त्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी लागणारी यंत्रे व अवजारे आरोग्य खात्याला द्यावीत, अशी सूचनाही त्यांनी नगरपालिका प्रशासनाला केली. तसेच बंदी घातलेल्या एकेरी वापरासाठीच्या प्लास्टिकसंबंधी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याची सूचना राणे यांनी या बैठकीत केली. या बैठकीला नगरविकास सचिव रमेश वर्मा, संचालक गुरुदास पिळर्णकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.