‘नगरनियोजन’ दुरुस्ती विधेयक गदारोळात संमत

0
8

>> ‘कलम 39 अ’ला जोरदार विरोध; गोंधळ घालणाऱ्या 6 विरोधी आमदारांना सभापतींनी मार्शलकरवी काढले सभागृहाबाहेर

गोवा नगरनियोजन कायदा (दुरुस्ती) विधेयक 2024 आवाजी मतदानाने काल विधानसभेत गदारोळातच संमत करण्यात आले. दुरुस्ती विधेयकातील ‘कलम 39 अ’ला विरोधी आमदारांनी जोरदार विरोध दर्शवला. या विधेयकावर मतविभाजनाची मागणी मान्य न केल्याने विरोधी 6 आमदारांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेऊन त्यांच्याकडे मतविभाजन घेण्याची मागणी लावून धरली. तसेच आमदारांनी हौदात जमिनीवर बसून घोषणाबाजीस सुरुवात केली. त्यामुळे सभापतींनी त्यांना सभागृहातून बाहेर काढण्याची सूचना मार्शलांना केली. मार्शलांनी पाच जणांना उठवून बाहेर काढले, तर सूचना करून सुध्दा खाली बसून घोषणाबाजी करणाऱ्या आपचे व्हेंझी व्हिएगस यांना मार्शलांनी अक्षरश: उचलून सभागृहातून बाहेर काढले. यावेळी विरोधी गटातील गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे आपल्या जागेवरच होते. गदारोळ सुरू असतानाच सभापतींनी दुरुस्ती विधेयक मंजूर करून सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवत पुढील विधेयक चर्चेसाठी घेतले.

नगरनियोजन खात्याकडे 16 ब कलमाखाली 7 हजारांहून अधिक अर्ज झोन बदलासाठी आले. त्यातील 1 हजार प्रकरणे अंतिम टप्प्यात होती. या 16 ब कलमाखाली जैवसंवेदनशील, बफर झोन आदी झोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता, असे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सभागृहात सांगितले. विरोधी पक्षातील आमदार युरी आलेमाव, व्हेंझी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, वीरेश बोरकर, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा यांनी नवीन कलमाच्या समावेशाबाबत विविध मुद्दे उपस्थित करून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच, 16 ब कलम रद्द केल्याने प्रलंबित 7 हजार प्रकरणांबाबत स्पष्टीकरण करण्याची मागणी केली. आमदार नीलेश काब्राल, दिगंबर कामत, कृष्णा साळकर यांनी दुरुस्तीचे समर्थन केले. नगरनियोजनातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती आवश्यक आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

नगरनियोजन कायद्यांतर्गत कलम 16 ब च्या जागी सरकारने कलम 39 अ अस्तित्वात आणले आहे. मात्र कलम 16 ब आणि कलम 39 अ मध्ये फरक काय? असा सवाल विरोधी आमदारांनी उपस्थित केला. गोव्यातील जमिनी एक प्रकारे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. नव्या कलम 39 अ ला विरोधी आमदारांनी जोरदार विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात बराच गदारोळ झाला. विरोधी आमदारांनी यावेळी या दुरुस्ती विधेयकावर मतदानाची मागणी करुन सभापतींच्या हौदात धाव घेतल्याने त्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले. यावेळी गदारोळातच सदर दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले.

दरम्यान, विधानसभेत काल आणखी पाच विधयके संमत करण्यात आली. संमत विधेयकामध्ये गोवा जमीन वापर (दुरुस्ती) विधेयक 2024, गोवा जीएसटी (दुरुस्ती) विधेयक 2024, गोवा मूल्यवर्धीत कर (सुधारणा) विधेयक 2024 आणि गोवा मोटर वाहन कर (दुरुस्ती) विधेयक 2024 आणि गोवा इमारती लीज, रेंट नियंत्रण (दुरुस्ती) विधेयक 2024 चा समावेश आहे.

तज्ज्ञ समिती स्थापन करणार : राणे

नगरनियोजन कायद्यातील दुरुस्तीच्या माध्यमातून 16 ब कलम रद्द करण्यात आले असून, त्या जागी नवीन 39 अ चा समावेश करण्यात आला आहे. नवीन कलमांतर्गत जमीन प्रकरणांवर विचारविनिमय करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे, असे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सभागृहात सांगितले.

कलम 16 ब मागील दाराने आणले : कामत

आपल्या कार्यकाळात तज्ज्ञाच्या मदतीने एक चांगला प्रादेशिक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात काही त्रुटी आढळून आल्या होत्या. नगरनियोजन कायद्यात 16 ब कलम मागील दाराने आणण्यात आले होते. आता, नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.