बस्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांकडून नवे आदेश जारी
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात 11 जवान शहीद झाले होते. त्यामध्ये 10 जिल्हा राखीव रक्षक आणि एका चालकाचा समावेश होता. नक्षली हल्ल्यानंतर बस्तर विभागातील सर्व 7 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाहनांच्या वापराबाबतही पोलीस महानिरीक्षकांनी नवे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा दलांना वाहनांचा वापर करताना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच नक्षलवाद्यांनी टाकलेल्या भूसुरुंगांचा शोध घेऊन त्यापासून सावध राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
दंतेवाडा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बस्तर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना (एसपी) हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी हे आदेश जारी केले आहेत. बस्तर विभागात कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, बस्तर, दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या सातही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मार्च ते जूनच्या मध्यापर्यंत म्हणजेच ऐन उन्हाळ्यात, नक्षलवादी टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन चालवतात आणि याअंतर्गत मोठे हल्ले व स्फोट घडवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही या काळात सुरक्षा दलांवर अनेक हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षकांनी सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास आणि नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यास सांगितले आहे.