Home Featured नंद्रण-मोले येथे अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नंद्रण-मोले येथे अपघातात दोन युवकांचा मृत्यू

0

पार्क केलेल्या ट्रकला बसली दुचाकीची धडक

दुचाकीचालकाला डुलकी लागल्याने अपघाताचा अंदाज

नंद्रण- मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर पार्क केलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची (यामाहा आर-15) धडक बसून दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुचाकी चालक राजेश तुकाराम देसाई (25, आकेटी – अनमोड) व निखिल मडीवल (24, हलीयाळ- कर्नाटक) यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दुचाकीचालक ट्रकला धडक दिलेल्या दुचाकीवर गंभीर अवस्थेत तसाच पडून राहिल्याने दुचाकीचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताचे कारण स्पष्ट होत नसले नसले तरी दुचाकीचालक राजेश देसाई याला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून कर्नाटक राज्यात जाणारा केए -28-सी – 9946 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक नंद्रण- मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त झाला. रात्रीची वेळ असल्याने ट्रक चालकाने इंडिकेटर चालू ठेवून वाहतुकीला धोका असल्याची सूचना केली. तसेच ट्रकच्या मागे रस्त्यावर लाकूड ठेवून वाहनचालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला होता.
म्हापशाहून सुसाट वेगाने कर्नाटक राज्यात जाणाऱ्या जीए 04 सी 1310 या यामाहा आर-15 दुचाकीची धडक मागाहून ट्रकला बसली. यात दुचाकीचालक राजेश देसाई व निखिल मडीवल गंभीर जखमी झाले. दुचाकी चालक राजेश देसाई यांनी डोक्यावर घातलेले हेल्मेट अपघातात फुटले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांनाही त्वरित 108 रुग्णवाहिकेतून पिळये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. पण आरोग्य केंद्र दाखल होण्यापूर्वी गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दुचाकी चालकाला सकाळच्यावेळी डुलकी लागल्याने अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात
आहे.

अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलीस स्थानकाचे हवालदार भैरू झोरे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विभावरी गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांच्या मृतदेहांची मडगाव येथील सरकारी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

खासगी कंपनीत नोकरी
प्राप्त माहितीनुसार अपघातात मृत झालेले दोन्ही तरुण हे साळगांव-म्हापसा एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. अपघातात मृत झालेला दुचाकीचालक राजेश देसाई हा अविवाहित होता. दुचाकीच्या मागे बसलेला निखिल मडीवल याचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सोमवारी पत्नीच्या आधार कार्डची दुरुस्ती करण्यासाठी निखिल मडीवल हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात होता. पण नंद्रण- मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.