आजपासून पावसाचा जोर कमी होणार
मागील दोन-तीन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल देखील कायम राहिला. दिवसभरात सातत्याने पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परिणामी अनेक ठिकाणचे रस्ते आणि सखल भागांत पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. जोरदार पावसाबरोबराच सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. दरम्यान, येथील हवामान विभागाने राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यातील विविध भागांत शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. राज्यात गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. गुरुवारच्या तुलनेत काल पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याने नद्यांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत 3.42 इंच पावसाची नोंद झाली. राज्यातील पावसाने 75 इंचाचा टप्पा ओलांडला असून, आत्तापर्यंत 75.70 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 22 जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली असून, हवामान विभागाने 22 जुलै ते 25 जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखीन 74 घटनांची नोंद झाली. फोंडा येथे सर्वाधिक 14 घटना, कुडचडे आणि पेडणे येथे प्रत्येकी 9, तसेच अन्य ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली. त्यात 2 लाख 58 हजार रुपयांचे नुकसान झाले.