धोनीसारखा ‘फिनिशर’ बनायचेय

0
112

>> मिलरने केले भरभरून कौतुक

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा यूएईत १९ सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. स्पर्धेत केवळ पाच दिवसांचा कालावधी असून सर्व संघातील खेळाडू स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच राजस्थान रॉयल्सच्या पॉवर-हिटर डेव्हिड मिलरलाही यंदाचे पर्व गाजवायचे आहे. विशेष करून त्याला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करताना त्याच्या सारखा ‘फिनिशर’ बनायाचे आहे. तशी मनीषा त्याने ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ ला व्यक्त केली आहे.

मिलरने धोनीच्या फलंदाजीतील अलौकिक बुद्धिमत्तेवर आपण प्रेम करीत असल्याचे मान्य केले. परंतु त्याच्या फलंदाजीच्या शैलीचे अनुकरण करण्यापेक्षा त्याच्यासारखा फिनिशर बनण्याचे आपले ध्येय आहे, असे मिलरने सांगितले.

आपण धोनीचा चाहता आहे. परंतु आपण त्याच्या फलंदाजीची क्षमता आणि कमकुवतपणाही ओळखतो, असे मिलरने सांगितले. धोनी ज्या पद्धतीने चाललाय ते मला खरोखरच आवडते. नक्तीच त्याच्या शांत स्वभावामुळे तो पूर्णतः नियंत्रणात असतो. त्याच्या सारखीच उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न मी ही करतो, असे मिलर म्हणाला.
एक फलंदाज म्हणून त्याचीही ताकद आणि कमजोरी आहेत. माझेही तसेच आहे. मी लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्यासारखी फलंदाजी करू इच्छितो. त्याच्यासारखा ‘फिनिशर’ बनू इच्छितो. धोनी हा आत्तापर्यंतचा एक सर्वोत्कृष्ट ‘फिनिशर’ आहे. त्याने बर्‍याचदा ते सिद्धही करून दाखवलेले आहे आणि त्याला खेळताना पाहणे पाहणे मला आवडते, असे मिलरने सांगितले. गेल्या ८ वर्षे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात असलेल्या मिलर यंदा प्रथमच रॉयल्स संघाकडून खेळणार आहे.