डॉमनिक थिम चॅम्पियन!

0
107

>> मॅरेथॉन लढतीत आलेक्झांडर झ्वेरेवला नमविले

ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने जर्मनीच्या आलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत करून यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. त्याचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. थिमने भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री झालेल्या लढतीत झ्वेरेवला २-६ ४-६ ६-४ ६-३ ७-६(६) असे पराभूत केले. ४ तास २ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच यूएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळला. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावरील २७ वर्षीय थिम यापूर्वी, फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्या तीनही अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. १९९६ मध्ये बोरिस बेकरनंतर न्यूयॉर्कमध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला जर्मन पुरुष खेळाडू होण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेल्या झ्वेरेवला पहिल्या दोन्ही सेटमधील लय कायम राखता आली नाही.

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी पूर्वीच स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सर्बियाच्या नोवाक जोकोविचला यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, पण जोकोविचच्या अनपेक्षित हकालपट्टीनंतर अमेरिकन ओपन टेनिसला सहा वर्षानंतर नवीन विजेता मिळणार हे निश्चित झाले होते. दरम्यान, ग्रँड स्लॅम जिंकणारा थिम हा ऑस्ट्रियाचा दुसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी थॉमस मस्टरने १९९५ फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले होते. पण, पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी थिमला मोठी प्रतीक्षा करावी लागली.

याआधी तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात थिमचा पराभव झाला होता. दोन फ्रेंच ओपन फायनल सामन्यात थिमला १९ ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालकडून, तर यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचकडून पाच जबरदस्त सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

पुरुष एकेरीत सलग चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी पाच सेटपर्यंत चालण्याची ही पहिलीच वेळ ठरली. २०१९ विंबल्डन, २०१९ यूएस ओपन, २०२० ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांतही पुरुष एकेरीचा अंतिम सामना पाच सेटपर्यंत रंगला होता. १९२७ व १९४६ साली सलग तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांत असे घडले होते.

१९९०च्या दशकात जन्मून ग्रँडस्लॅम जिंकलेला डॉमनिक थिम हा पहिलाच पुरुष खेळाडू आहे. महिलांमध्ये १९९०च्या दशकात किंवा नंतर जन्मलेल्यांच्या नावावर एकूण १५ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. यात २०००च्या दशकात जन्मलेल्या बियांका ऍड्रिस्कू (२०१९, यूएस ओपन) हिचा समावेश आहे.

ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन सेटनी पिछाडीवर पडल्यानंतर जेतेपदाला गवसणी घालणारा डॉमनिक थिम हा पाचवा पुरुष खेळाडू ठरला. गॅल्सटन गावडियो (वि. वि. गुलेर्मो कोरिया, २००४, फ्रेंच ओपन), आंद्रे आगासी (वि. वि. आंद्रे मेदवेदेव, १९९९ फ्रेंच ओपन), इव्हान लेंडल (वि. जॉन मॅकेन्रो, १९८४ फ्रेंच ओपन), बियॉ बॉर्ग (वि. वि. मानुएल ओरांतेस, १९७४ फ्रेंच ओपन) हे इतर खेळाडू आहेत.