धेंपो ज्युनियर्सने एकतर्फी सामन्यात घुमटेश्वर वॉरियर्सवर ८६ धावांनी विजय मिळवून नूराणी टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकली. नूराणी स्पोटर्स अँड कल्चरल क्लबने फेलिसिटी ग्रुपच्या साहाय्याने सदर स्पर्धा चिखली येथील साग मैदानावर आयोजित केली होती.
अंतिम सामन्यात धेंपोने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद २१५ धावा केल्या. सामनावीर भारत अर्कसने ४० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ७६ धावांची तुफानी खेळी साकारली. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना घुमटेश्वरचा संघ १२९ धावांत आटोपला. विजेत्या संघाने १ लाख रुपये व चषकाची कमाई केली. उपविजेत्यांना ५० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव दया पागी, खजिनदार जमीर करोल यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले.
संक्षिप्त धावफलक ः धेंपो ज्युनियर्स ः २० षटकांत ४ बाद २१५ (भारत अर्कस ७६, निखिल नाईक नाबाद ३५, अमेय धामशेकर ३१, शेरबहादूर यादव २९, तेकबहादूर २६-२, हरिष नाईक ३७-१, सत्यजीत बछाव २३-१) वि. वि. घुमटेश्वर वॉरियर्स १८ षटकांत सर्वबाद १२९ (नौशाद शेख २४, अनिकेत देसाई १९, रितुराज गायकवाड २१, शेरबहादूर यादव १४-३, रॉबिन डिसोझा ३३-२, विनय चौधरी ३५-२)