गुढी उभारू संस्कारांची!

0
235

– रमेश सप्रे

 

गुढीपाडवा हा नववर्षसंकल्पांचा दिवस. काहीतरी नवी गोष्ट शिकणं, नवं कौशल्य प्राप्त करणं, नवे छंद आत्मसात करणं, त्याचबरोबर आपल्यातले काही दोष-दुर्गुण दूर करण्याचा संकल्प केला जातो. पण त्याच्यामागे इच्छाशक्ती, जिद्द, सातत्य नसेल तर संकल्प वांझोटेच राहतील. दिसायला आकाशातल्या चंदेरी-रुपेरी ढगांसारखे सुंदर दिसतील, पण जोराचा वारा आला की विस्कळीत होऊन विरून जातील. सर्वांना उपयोगी अशा पाण्याचा थेंबही देऊ शकणार नाहीत. असं असलं तरी गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवे संकल्प अवश्य करूया नि ते प्रत्यक्षातही उतरवूया. त्यासाठी, आणि सुयश-समृद्धी नि समाधान यांनी उदंड भरलेलं नवं वर्ष जावं यासाठी अनेकानेक शुभभकामना!

 

जगात अनेक संस्कृती आहेत. प्रत्येक संस्कृतीचे विशेष असे सण-समारंभ-सोहळे आहेत. साजरा करण्याच्या पद्धतीही विविध आहेत. अनेक रंग, अनेक ढंग, अनेकानेक परंपरा नि प्रतीकं. काळाच्या ओघात हे सारं कालबाह्य होत नाही. विशेषतः प्रतीकं टिकून राहतात. त्यातील प्रतीकात्मकता (सिंबॉलिझम) क्वचित बदलते. होळीचंच उदाहरण घेऊ की! लाकडं जमवणं, जाळणं, बोंब मारणं, दुसर्‍या दिवशीची धुळवड यांतील अतिरेक हा निषेध करण्यासारखाच. पण ती पेटलेली होळी, तिची पूजा, तिच्यानिमित्तानं घराघरांत केलेली पोळी, त्या प्रदीप्त अग्नीच्या साक्षीनं मनोमन किंवा सामूहिकपणे प्रकट केलेले आपल्यातील दोष-दुर्गुण जाळण्याचे संकल्प, या गोष्टी आजही मोलाच्या आहेत. गेली काही वर्षे त्यादृष्टीनं प्रयत्न आणि प्रयोगही सुरू आहेत.

होळीचे रंग एकमेकांवर उडवताना, परस्परांना लावताना त्यात अश्‍लीलता, बीभत्सपणा यायला नको. ‘बुरा न मानो, होली है’ म्हणत वाट्टेल ते करायचा परवाना मिळत नाही. गोपी-राधा-कृष्ण यांच्यातील होलीप्रसंगावर आधारित लोकगीतं, लोकसंगीत हा आपल्या संस्कृतीचा विलोभनीय विशेष आहे. अशा रंगपंचमीचा संस्कार असला पाहिजे- समरसतेचा, समतेचा, एक्याचा. अनेक रंग मिळून रंगपंचमी खेळली जाते, हा अनुभव विविधतेतून एकता- एकात्मता याचा संस्कार आपल्या मनावर घडवणारा आहे. हाच खरा सर्व सणांचा उद्देश आहे नि संदेशही आहे.
गुढीपाडव्याचा संस्कार पाहण्यापूर्वी थोडी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहू. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी शालीवाहन कालगणनेनुसार नवं वर्ष सुरू होतं. ही कालगणना दक्षिण भारतात अधिक प्रचलित आहे. पूर्वी कोणतीही ऐतिहासिक घटना घडली (उदा. नव्या राजाचा राज्याभिषेक) किंवा एखादी खूप महत्त्वाची कामगिरी पार पडली (उदा. महत्त्वाच्या युद्धात निर्णायक विजय) की नवी कालगणना सुरू करण्याचा प्रघात होता. युधिष्ठिराच्या नावेसुद्धा शक सुरू झाला. त्याचा हस्तिनापूरला महाभारत युद्धानंतर झालेला राज्याभिषेक नि त्याच सुमारास द्वापर युग संपून सुरू झालेलं कलियुग अशा संधिकालात सुरू झालेल्या या कालगणनेला ‘युधिष्ठिर शक’ किंवा ‘कलियुगाब्द’ (म्हणजे कलियुगाची वर्षं) असं संबोधलं जातं. काहीजण युधिष्ठिर शक आणि कलियुगाचा आरंभ यात छत्तीस वर्षांचं अंतर मानतात.
या वर्षी गुढीपाडव्यापासून कलियुगाब्ध ५१२० सुरू होत आहे, तर शालिवाहन शक १९४० सुरू होतोय. एका महत्त्वाच्या युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ हा शक (कालगणना) सुरू झाला. नव्या वर्षाचा आरंभ म्हणून घरोघरी गुढ्या-तोरणं उभारली गेली. मोठ्या उत्साहानं चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस ‘पाडवा’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. आजही तो केला जातो.

काळाच्या ओघात कर्मकांडं, पारंपरिक रीतिरिवाज उरले, पण त्यातील हृद्य भाव लुप्त होऊ लागलाय. आज पुन्हा अनेक संघटना, संस्था यांच्या माध्यमातून अशा सणांच्या साजरीकरणाचं नि सादरीकरणाचं पुनरुज्जीवन होऊ लागलंय. पण त्यात भडकपणा, अभिनिवेश, दिखावटी भपका यांचा प्रत्यय येऊ लागलाय. मग तो पाडवा असो की गणेशोत्सव किंवा नवरात्री. या सार्‍यातून गमावले जाताहेत ते संस्कार नि त्यानिमित्तानं करावयाचे संकल्प.

गुढी पाडव्याची गुढी हे एक सर्वांगसुंदर प्रतीक आहे. पण त्याहीपेक्षा ज्या राजाच्या विजयाप्रीत्यर्थ गुढी उभारली जाते त्या विजयाचा संस्कार मनावर घडवून घेणं आवश्यक आहे. पिताश्रींचं राज्य कटकारस्थानं करून सेनापती, प्रधानमंत्री आदी मंडळींनी हिरावून घेतलं. त्यांची हत्या झाली. राणी आपल्या पुत्रासह जीव मुठीत धरून पळाली. एका विश्‍वासू नि स्वामिनिष्ठ कुंभाराच्या घरी त्यांनी आश्रय घेतला. छोटा राजपुत्र आता सामान्य कुंभाराचा मुलगा बनला. त्याच्याबरोबर मातीची खेळणी, मूर्ती करू लागला. आतून प्रेरणा मिळाल्यामुळे त्यानं गाय-बैल, कुत्री-मांजरं यांची मातीची खेळणी बनवण्याऐवजी घोडे, शिपाई, शस्त्रधारी सैनिक, राजा असं मतीचं सैन्यच तयार केलं. आख्यायिका सांगितली जाते की या मातीच्या सैन्यात त्या राजपुत्रानं आपली जिद्द नि अंतःस्फूर्ती यातून प्राण फुंकले. ते सैन्य जिवंत होऊन, राज्यावर बसलेल्या सेनापती इत्यादींचा पराभव करून तो पुन्हा सिंहासनावर बसला.
या पराक्रमाचा संस्कार कोणता? जिजामातेनं सांगितलेल्या अशाच प्रकारच्या कथांतून प्रेरणा घेऊन शिवबानं अक्षरशः साध्याभोळ्या मावळ्यांतून सैन्य उभारलं नि यावनी सत्तेला विजयी आव्हान दिलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या राज्याभिषेक दिनापासूनही नवी कालगणना- शिवशक- सुरू झालं. म्हणजे गुढीपाडव्याचा खरा संस्कार शिवबानं स्वतःवर करून घेतला. नवं वर्ष सुरू होतं. पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा. काहींच्या मते प्रतिपदा शब्दाचा अपभ्रंश म्हणजे एक रूप पाडवा हे बनलं, तर काहींच्या मते नव्या वर्षाचा आरंभ हे एक पवित्र पर्व असतं. पर्व म्हणजे पर्वणी, एक सुसंधी. या ‘पर्व’ शब्दाचं रूप ‘पाडवा’ असं बनलं.
चैत्र सुरू झाला की सृष्टीचं चित्र बदलतं. थंडीतला गारठा कमी होतो. फुलाफळांचा वसंत ऋतू सुरू होतो. मधुर, रसाळ फळं नि सुगंधी फुलं जणू नव्या वर्षाचं स्वागत करायला अवतरतात. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अर्थ उलट टाकलेलं (प्रति) पाऊल (पद). आपलं पंचांग हे चांद्रपंचांग (ल्यूनर कॅलेंडर) आहे. चंद्र दर महिन्यात दोन उलटी पावलं टाकून प्रवास सुरू ठेवतो. पौर्णिमेला पूर्ण अवस्था गाठली की वद्य प्रतिपदेला पाऊल उलटं टाकून प्रवासाची दिशा बदलतो. आता तो कमी कमी होत अमावस्येला दिसतच नाही. पण दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रतिपदा. शुद्ध प्रतिपदा. आता पुन्हा चंद्राच्या कलांचा विकास होत जातो तो पौर्णिमेपर्यंत. नंतर पुन्हा उलटं पाऊल (अनाउट टर्न) नि प्रतिपदा.

गुढीपाडवा तर वर्षारंभाची प्रतिपदा. म्हणून संपूर्ण वर्षासाठी जर काही निर्धार, संकल्प करायचे असतील तर सुवर्णसंधी असते. सहज जाता जाता- आणखी एक पाडवा असतो. चैत्रातला संसार पाडवा तर कार्तिकातला बळीचा पाडवा. या दिवसापासूनही नवं विक्रम संवत्सर सुरू होतं. विशेषतः उत्तर भारतात.
पाडव्याचा लक्षणीय विशेष म्हणजे घराघरांवर उभारलेली गुढी. ध्वज, निशाण, झेंडा याच अर्थाचा शब्द आहे गुढी. त्याला म्हणतातही धर्मध्वज किंवा ब्रह्मध्वज. ही गुढी उभारल्यावर तिला नमस्कार करून प्रार्थना करायची असते-
ब्रह्मध्वज, नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद|
प्राप्तेत्स्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू॥
या नवीन वर्षात (नूतन संवत्सरात) आमच्या घरातल्या (कुटुंबातल्या) सर्वांचं कल्याण कर, अशी प्रार्थना गुढीची करायची असते.

गुढीचा आणखी महत्त्वाचा संस्कार म्हणजे ती प्रकाशाच्या, आकाशाच्या दिशेनं वर, ताठ उभी राहते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं खडी राहते. याचा महत्त्वाचा संस्कार म्हणजे जमिनीशी निगडीत प्रपंच करताना जीवनाला काहीतरी उच्च ध्येय असायला हवं. केवळ प्रपंच एके प्रपंच पुरेसं नाही नि योग्यही नाही.
गुढीला सजवताना रेशमी कपडा, धातूचा कलश (भांडं) घट्ट बांधून, तिला फुलांची माळ घालतात. शिवाय कडुनिंबाची छोटी फांदीही बांधतात. काही भागांत साखरेच्या पदकांची माळही घातली जाते. या सार्‍या पदार्थांचा एक विशिष्ट संदेश आहे. गुढीपाडव्याला संसार पाडवा म्हणतात म्हणून वस्त्र, धातूचा कलश या गोष्टी आवश्यक ठरतात. त्याचप्रमाणे पुष्पमालांची सजावट करून कडुनिंब व साखरेच्या पदकांची माळ संदेश देतात की, नूतन वर्षात कडू-गोड, सुख-दुःखाचे प्रसंग असणारच. सार्‍या घटना-प्रसंगांचा हसतमुखानं स्वीकार करायला हवा. किती समर्पक संदेश आहे हा नव्या वर्षासाठी!
गुढीपाडवा हा अतिशय पवित्र दिवस असल्यानं संपूर्ण मुहूर्त मानलाय. असे एकूण साडेतीन मुहूर्त मानले जातात. गुढीपाडवा, दसरा नि अक्षय तृतीया हे पूर्ण मुहूर्त तर बलिप्रतिपदा (बळीचा पाडवा) हा अर्धा मुहूर्त समजला जातो. गुढीपाडव्याला कितीतरी नवे उद्योग, व्यवसाय, प्रकल्प सुरू केले जातात. दुकानं, कार्यालयं यांचा समारंभ, तसेच भूमिपूजन, गृहप्रवेश असे समारंभही केले जातात.

तसं पाहिलं तर चांगला उपक्रम किंवा एखादं सत्कार्य करायचं असेल तर आपला उद्देश चांगला असल्याने मुहूर्ताचा फार आग्रह धरण्याची आवश्यकता असतेच असं नाही. यासंदर्भात एक मार्मिक कथा विचार करण्यासारखी आहे.
एक राजा आपले काही मंत्री, सेनापती, राजपुरोहित नि थोडे सैनिक घेऊन राज्याच्या दौर्‍यावर निघतो. तो आपल्या राज्याच्या सीमेजवळ पोचल्यावर रथातून खाली उतरतो. सीमारेषेवर उभं राहिल्यावर त्याला पलीकडच्या राज्यातील डौलात डोलत असलेली शेतं, फुलाफळांनी बहरलेली उद्यानं दृष्टीस पडतात. ती पाहून त्यानं हातानं खूण करून तो प्रदेश जिंकण्याचा निर्णय घेतला. असं करताना त्याच्या हातातली मुद्रिका (मुदी) परराज्याच्या सीमेत पडली. सर्वांना तो अपशकुन वाटला. राजपुरोहितांना राजमुद्रा जमिनीवर पडणं हा शुभसंकेत वाटला नाही. सेनापतीनं अधिक सैन्यासह नंतर चढाई करणं योग्य असल्याचं सांगितलं. मंत्र्यांनीही अशी स्वारी करणं योग्य नसल्याचं मत दिलं. यावर हसून तो राजा उद्गारला, ‘‘मला वाटतं आमची मुद्रिका परराज्याच्या भूमीवर पडली याचा अर्थ आमची राजमुद्रा त्या राज्यावर उमटली. ते राज्य आमचं झाल्यासारखंच आहे.’’ असं म्हणून त्यानं तो भूप्रदेश जिंकून घेतला.

याचा अर्थ शुभमुहूर्ताचा विचार करायचा नाही असा नाही, तर योग्य मुहूर्त निवडूनदेखील त्याच्या जोडीला आत्मविश्‍वास व अचूक प्रयत्न नसतील तर विशेष यश मिळत नाही.
कर्नाटकात गुढीपाडव्याला ‘उगादी’ म्हणजे युगादी (युगारंभ, नववर्षारंभ) असं म्हणतात. गुढीपाडव्याचा एक कार्यक्रम म्हणजे नव्या वर्षाचं पंचांग नि वर्षफल यांचं वाचन. पूर्वी जोशी (भटजी) येऊन असं सामूहिक वाचन करी. त्या काळात साक्षरता कमी असल्यामुळे अनेक लोकांना स्वतः वाचता येत नसे. पण पाऊस केव्हा, कुठे, किती पडेल याविषयी सामान्य लोकांना उत्सुकता असे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात हे अपेक्षितही असे. कुठे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, कुठे अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडू शकेल याविषयीचा अंदाज वाचला जात असताना तो ऐकणं हा असंख्य शेतकर्‍यांना मोठा अनुभव असे.

यासंदर्भात रामकृष्ण परमहंसांचे उद्गार मोठे मार्मिक आहेत. ते म्हणत, ‘‘भले पंचांगात लिहिलंय तीस-चाळीस इंच पाऊस पडेल, पण तो प्रत्यक्षात पडेल तेव्हाच खरा. पंचांग कितीही पिळलं तरी एक थेंबही पाणी गळणार नाही.’’
गुढीपाडवा हा नववर्षसंकल्पांचा दिवस. काहीतरी नवी गोष्ट शिकणं, नवं कौशल्य प्राप्त करणं, नवे छंद आत्मसात करणं, त्याचबरोबर आपल्यातले काही दोष-दुर्गुण दूर करण्याचा संकल्प केला जातो. पण त्याच्यामागे इच्छाशक्ती, जिद्द, सातत्य नसेल तर संकल्प वांझोटेच राहतील. दिसायला आकाशातल्या चंदेरी-रुपेरी ढगांसारखे सुंदर दिसतील, पण जोराचा वारा आला की विस्कळीत होऊन विरून जातील. सर्वांना उपयोगी अशा पाण्याचा थेंबही देऊ शकणार नाहीत.
असं असलं तरी गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवे संकल्प अवश्य करूया नि ते प्रत्यक्षातही उतरवूया. त्यासाठी, आणि सुयश-समृद्धी नि समाधान यांनी उदंड भरलेलं नवं वर्ष जावं यासाठी अनेकानेक शुभभकामना!