धेंपोचा काकुलो गोवन्सवर थरारक विजय

0
99

जीपीएल क्रिकेट
सामनावीर सगुण कामतच्या कर्णधारपदास साजेशा शैलीदार ९२ आणि मानसिंग निगडेच्या धडाकेबाज नाबाद ३२ धावांवर धेंपो क्रिकेट क्लबने गोवा प्रिमियर लीगमध्ये विजयी सलामी देताना काकुलो गोवन्सवर ६ गडी आणि ७ चेंडू राखून थरारक विजय प्राप्त केला.
पवर्ंरी येथील जीसीए अकादमी मैदानावरील या सामन्यात काकुलो गोवन्सने नाणेफेकीच्या अनुकूल कौलानंतर प्रथम फलंदाजीत निर्धारित २० षट्‌कात ३ बाद १६४ धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठला. प्रत्युत्तरात धेंपो क्रिकेट क्लबने १८.५ षट्‌कात ४ बाद १६६ धावा नोंदवीत स्पर्धेतील पहिला विजय नोंदला.१६५ धावांच्या पाठलागातील धेंपोचा सलामीवीर रोहन बेळेकर (९) स्वस्तात बाद झाला. तथापि, सगुण कामतने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत ५३ चेंडूत ९ चौकार आणि ५ षट्‌काराच्या आतषबाजीत ९२ धावा चोपल्या. त्याने रीगन पिंटोच्यासाथीत (३२ चेंडूत २२ धावा) दुसर्‍या यष्टीसाठी ९९ धावांची भागीही केली. अखेरीस मानसिंगने बेदरकार फटकेबाजीत केवळ ११ चेंडूत २ चौकार आणि ३ षट्‌कारासह नाबाद ३२ धावा चोपीत ७ चेंडू राखीत विजय झळकविला.
तत्पूर्वी, काकुलो गोवन्सने प्रथम फलंदाजीत ३ बाद १६३ धावा केल्या. सलामीवीर सलमान अहमद (३३ चेंडूत ६ चौकार आणि एका षट्‌कारासह ४१), कर्णधार स्वप्निल अस्नोडकर (२८ चेंडूत ४ चौकार आणि एका षट्‌कारासह ३६) यानी दमदार प्रारंभ करून देताना ६५ धावांची सलामी दिली. अखेरीस रोहित अस्नोडकर (नाबाद २४) आणि सनी पटेल (२२ चेंडूत १ चौकार आणि ४ षट्‌कारासह नाबाद ४२) यांनी ७१ धावांची भागी नोंदविली. काकुलो गोवन्सचा हा सलग दुसरा पराभव होय.
संक्षिप्त धावफलक : काकुलो गोवन्स २० षट्‌कात ३ बाद १६४ (सलमान अहमद ४१, स्वप्निल अस्नोडकर ४१, जयकिशन कोलसावल ११, रोहित अस्नोडकर नाबाद २४, सनी पटेल नाबाद ४२ धावा. ज्योकिम मोरेरा २-२४ बळी) पराभूत वि. धेंपो क्रिकेट क्लब १८.५ षट्‌कात ४ बाद १६६ (रोहन बेळेकर ९, सगुण कामत ९२, रीगन पिंटो २२, अरुण चापराना ७, मानसिंग निगडे नाबाद ३२, मणिशंकर नाबाद ३ धावा, सलमान अहमद २-४७, गौरेश गावस १-२८ बळी).