धुळेर म्हापसा येथील दुचाकी शोरूमजवळ टेम्पो व दोन दुचाकी यांच्यात शनिवारी झालेल्या अपघातात हिमाचल प्रदेश येथील रिया राकेश गुप्ता (२२) हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक व दुचाकी चालकाला अटक केली आहे. रिया गुप्ता व तिचा साथीदार करण कमल सबरमनाल (२५, मूळ हरियाणा, सध्या धारगळ) हे करासवाडाच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्या जीए ०३ एए ८०७८ या मोटारसायकलची धडक बसली. यावेळी मागे बसलेली रिया ही रस्त्यावर फेकली गेली. याचवेळी करासवाडामार्गे पर्वरी येथे जात असलेल्या एका वर्तमानपत्राच्या केए २२ डी ४४४३ या टेम्पोचे मागचे चाक रियाच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना टेम्पोही रस्त्यावर उलटला. अपघातात करण याला किरकोळ जखमा झाल्या असून दुसरा दुचाकीस्वार परशुराम नाईक बंदिरवाडा तुये पेडणे (३६) यांचा पाय फॅ्रक्चर झाला आहे. टेम्पोचालक रमेश दुर्गाप्पा खोत (बेळगाव) हेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघात प्रकरणी रमेश खोत व करण सबरमनाल यांना अटक केली आहे.