भारताची सध्याची अव्वल धावपटू हिमा दास हिची आसाम सरकारने या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवले आहे.
आसामच्या धिंग गावात जन्मलेली २० वर्षीय युवा हिमा दास ही यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेली सर्वांत तरुण उमेदवार ठरली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हिमाने आंतरारष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करताना अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. २०१८ साली टेंपेरे-फिनलँड येथे झालेली अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी हीना ही भारताची पहिली धावपटू ठरली होती. त्यानंतर तिने ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य, ४४०० मिश्र रिलेमध्ये सुवर्ण तर जकार्ता आशियाई खेळांत महिलांच्या ४४०० मी. रिलेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. २०१९साही हिनाची कामगिरी सरस राहिली होती.
तिने बरीच सुवर्णपदके मिळविली होती. हिमा त्यानंतर दोहा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार होती. परंतु तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. हिमाला यापूर्वी २०१८साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांच्या शर्यतीत भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्याशी स्पर्धा असेल.