धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणार

0
30

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा; जुने गोवे येथे महात्मा गांधी जयंती साजरी

राज्यात सर्वधर्म समभाव कायम आहे. तथापि, काही जणांनी त्याला तडा घालवण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुने गोवे येथे महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाला बोलताना काल दिला.

राज्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. त्यात गुंतलेल्यांना अटक करण्यात आली आहे. एका पाद्रीने हिंदू धर्माबाबत अवमानकारक उद्गार काढले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणारी पोस्ट हल्लीच व्हायरल झाली आहे, त्या प्रकरणी कारवाई केली जात आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत दुसऱ्या धर्माचा द्वेष करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याचे सत्र सुरू झाले आहे. मात्र सरकार धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सहन करणार नाही. कोणीही दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्वांनी आपापल्या धर्माचे पालन करावे, प्रार्थना कराव्यात. मात्र, इतर धर्मांचा द्वेष करू नये. गोवा हे एक पर्यटन राज्य असून, येथील सर्वधर्म समभाव कायम राखण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महात्मा गांधींनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे. त्यांच्या शिकवणीचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे. हीच खरी गांधीजींना आदरांजली ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

मुस्लिम समाज शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
इस्लाम धर्माबाबत इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट टाकून टीका करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुस्लीम समाजाच्या एका शिष्टमंडळाला काल दिली.
पर्वरी येथे काल भाजपचे प्रवक्ते आणि हज समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला आणि इतर मुस्लीम बांधवांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून इस्लाम धर्मावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तो व्यक्ती कुठेही असला तरी त्याला सोडण्यात येणार नाही. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

सोशल मीडियावर इस्लामविरोधी पोस्ट टाकल्यानंतर शनिवारी राज्यात खळबळ उडाली होती. मडगाव, पणजी, म्हापसा व इतर भागातील मुस्लीम बांधवांनी पोलीस स्थानकांवर गर्दी करून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

इन्स्टाग्राम आयडी कोणी आणि कसा तयार केला, याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार केले आहे. शोध घेण्यासाठी किमान चार दिवस लागतील. संशयित देशात कुठेही असला तरी त्याला गोव्यात आणून अटक केली जाईल. तो परदेशात असला, तर त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली जाईल. तो देशात आल्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.