धारबांदोड्यातील डोंगरकापणी प्रकरणी दोघांविरुद्ध तक्रार

0
11

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील प्रतापनगर येथील डोंगरकापणी प्रकरणी समीर आनंद वाचासुंदर (रा. पर्वरी), तर धुल्लईतील डोंगरकापणी प्रकरणी मनोहर गावकर (रा. दावकोण-धारबांदोडा) यांच्याविरुद्ध उपजिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार (चेकलिस्ट) नगरनियोजन खात्याकडे दिली आहे. नगरनियोजन खात्याने जागेच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याशिवाय प्रतापनगर येथील घरे उभारलेल्या 26 जणांविरुद्ध तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

धुल्लई येथे मंगळवारी भरारी पथकाने पाहणी केल्यानंतर सध्या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तीची सध्या राजकीय आश्रय घेण्यासाठी धावपळ उडाली आहे. दुसऱ्या बाजूला सत्य उघड झाल्याने प्लॉट खरेदी केलेले व्यक्ती सध्या संबंधितांविरोधात रितसर फसवणूकीची तक्रार करण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर वन खात्याकडून सुद्धा जागेच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

धुल्लई येथे डोंगरावर जमीन सपाट करून तयार केलेले प्लॉटची सध्या विक्री करण्यात येत होती. अनेक जणांनी प्लॉट खरेदी केले असल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी भरारी पाथकांनी पाहणी केल्यानंतर बुधवारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. जागा सपाट करून अनेक झाडे मातीखाली गाडलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच अनेक झाडाचे ओंडके जमिनीवर दिसून आले. वन खात्याचे अधिकारी गोपाळ जल्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. कोणतीच परवानगी नसल्याने वन खात्याने यापूर्वी काम बंद केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले; पण प्लॉट विक्रीच्या नादात या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींनी बिनधास्त झाडांची कत्तल केल्याचे दिसून आले. दरम्यान, धारबांदोडा येथील सरकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात जंगलात डोंगरकापणी करून प्लॉट तयार करण्यात आले आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून परिसरातील अनेक जणांनी प्लॉट खरेदी केली असून, घरे उभारण्यासाठी चिरे प्लॉटवर आणून ठेवले आहेत. बुधवारी तालुक्याचे मामलेदार विमोद दलाल व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जागेचे मालक व प्लॉट ते करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.