संशयितास बंगळुरूहून अटक, मृत युवतीही बेंगळुरुची
प्रतापनगर – धारबांदोडा येथे सोमवारी सकाळी झुडपात मृतावस्थेत आढळून आलेल्या युवतीच्या खुनाचा 24 तासांत छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. संशयित संजय केविन एम. (22) याला बंगळुरू येथून ताब्यात घेऊन मंगळवारी सकाळी पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर रीतसर अटक करण्यात आली. या प्रकरणात मृत झालेली रोशिनी मोसेस एम. (22) ही युवती उत्तर बंगळुरू येथील असल्याचे उघड झाले झाले. भाड्याच्या कारचालकाला दिलेले आधारकार्ड संशयिताला गजाआड करण्यास कारणीभूत ठरले आहे. यात पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडीत अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला होता. युवतीचा गळा चिरून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. सकाळी एका स्थानिकाने मृतदेह दिसून आल्याची माहिती फोंडा पोलिसांना दिली. त्यानंतर दक्षिण गोव्याचे अधीक्षक टिकमसिंग वर्मा, उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर, कुळेचे निरीक्षक राघोबा कामत यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी काही धागेदोरे सापडल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकमध्ये पथके पाठवून संशयित संजय याला ताब्यात घेतले. संशयित संजय व मृत युवती रोशिनी यांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
कारचालकास अचानक बेंगळुरला नेण्याची विनंती
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी 5 ते 7 वाजण्याच्या दरम्यान संशयित संजय याने रोशिनी हिचा खून करून तिस्क – उसगाव गाठले. त्याठिकाणी एक भाड्याची कार केली. त्याने कळंगुट बीचवर जाण्यासाठी चालकास विनंती केली. त्यावेळी कारमध्ये चालकासहित कारचा मालक उपस्थित होता. कार घेऊन फोंडा येथे जात असतानाच एमआरएफ कंपनीजवळ पोहोचताच संजयने निर्णय बदलत बंगळुरूला नेण्याची विनंती केली. कार मालकाने संजयकडे ओळखपत्राची मागणी केली. तसेच रात्री हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून सोमवारी पहाटे बंगळुरू येथे जाण्याची विनंती केली. पण संजयने आपल्याला लवकर बंगळुरूला जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे मालकाने टॅक्सी चालकास संजयला बंगळुरू येथे पोहचविण्यास सांगितले. त्यानंतर चालक व संजय बंगळुरूला रवाना झाले. पण रात्री हुबळी येथे पोहोचल्यानंतर संजयने चालकाला माघारी गोव्यात पाठविले. पोलीस तपासात या कारचालकाचेही सहकार्य लाभले.
फोंडा पोलिसांनी गेल्या 8 दिवसांत व्यावसायिकाचे अपहरण व खुनाचा छडा लावण्यात निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दोन्ही गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फोंडा पोलिसांनी बंगलोर मध्ये जाऊन कारवाई केली आहे.