धारगळातील अपघातात दुचाकीचालक जागीच ठार

0
9

ओशेलबाग-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक दुचाकीचालक जागीच ठार झाला. हा अपघात काल रात्री घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एमएच-०४-जीसी-४८४४) आणि दुचाकी (क्र. जीए-०३-जे-१५३३) यांच्या हा अपघात झाला. कंटेनरचालक म्हापसा येथून पत्रादेवीच्या दिशेने जात होता, तर दुचाकीचालक हा पेडणेहून धारगळ येथे जात होता. दोन्ही वाहने ओशेलबाग येथे पोहोचली असता विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक देत अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कंटेनर उलटला आणि दुचाकीचालक त्याखाली सापडला. त्यात तो जागीच ठार झाला, तर दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत मृत पावलेल्या इसमाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. अपघाताची माहिती मिळताच पेडणे पोलीस आणि पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर करण्यात आला.