कोविड लस आता खुल्या बाजारात मिळणार

0
17

डीसीजीआयकडून लसींच्या विक्रीला सशर्त परवानगी भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या भारतातील दोन महत्त्वाच्या कोरोनाविरोधी लसींच्या बाजारातील खुल्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असे असले तरी या लसी थेट मेडिकल दुकानात उपलब्ध होणार नाहीत. खासगी रुग्णालये आणि दवाखान्यात जाऊनच या लसी खरेदी करता येतील आणि तिथेच त्या टोचल्या जातील.

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घेणे आणि लसीकरण हेच पर्याय आहेत. त्यातच भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला बाजारात विक्रीसाठी मान्यता दिली आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या कोरोनाविषयक तज्ञ समितीने १९ जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला काही अटींच्या अधीन राहून नियमित विक्रीसाठी मान्यता देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर भारताच्या औषध महानियंत्रकांनी त्याला मंजुरी दिली आहे.

या दोन्ही लसी मेडिकल दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये या लस खरेदी करता येतील आणि त्या तिथेच टोचल्या जातील.

खरेदी करण्यात येणार्‍या लसींचा संपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्द करावा लागणार आहे. संपूर्ण डेटा कोविन ऍपवर देखील अपडेट करावा लागेल. आपत्कालीन वापराबाबत १५ दिवसांच्या आत सुरक्षितता डेटा डीसीजीआयला द्यावा लागतो. आता सशर्त बाजार विक्रीमध्ये ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा सादर करावा लागेल. दरम्यान, या लसींची विक्री किंमत नेमकी किती असेल, याबाबत जाहीर केलेली नाही.