धनुष्यबाणासाठी लढाई सुरू; ठाकरेंना आज दुपारपर्यंतची मुदत

0
5

एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करू शकत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वेच्छेने पक्ष सोडला असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये लढाई सुरू असून, काल या प्रकरणी सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर शनिवारी दुपारपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना ८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. जर शिवसेनेच्या वतीने कोणतेही उत्तर आले नाही, तर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही आयोगाने पत्रातून स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.