दोन वर्षांनंतर २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

0
15

>> कोरोनाचा संसर्ग घटल्याने केंद्र सरकारचा निर्णय; परदेशवारी करू इच्छिणार्‍यांना दिलासा

परदेशवारी करू इच्छिणार्‍या भारतीय नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. केंद्र सरकारने नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली असून, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली असली, तरी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल ट्विट करत ही माहिती दिली. देशातील घटती कोरोना रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला असून, केंद्र सरकारने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय वाहतूक नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ‘एअर बबल’ व्यवस्था देखील बंद करण्यात येईल. या निर्णयामुळे विमानसेवा क्षेत्राची पुन्हा भरभराट होईल, असेही शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० पासून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी घातली होती. तसेच वेळोवेळी या बंदीमध्ये वाढ करण्यात आली होती. असे असले तरी, जुलै २०२० पासून जवळपास ३५ देशांसोबत ‘एअर बबल’ व्यवस्थेसह भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होती. आता नव्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सर्व देशांमध्ये सुरू होणार आहे.

देशातील सक्रिय रुग्णसंख्या
आता ५० हजारांच्या खाली

भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, रुग्णसंख्या कमी होत आहे. देशात मंगळवारी ३ हजार ९९३ रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून देशात ५ हजारांपेक्षा कमी रुग्ण नोंदवण्यात येत आहेत. सोमवारी देशात ४ हजार ३६२ रुग्ण आढळले होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली आली असून, देशात सध्या ४९ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ५ लाख १५ हजार २१० वर पोहोचली आहे, तर सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९८.६८ टक्के आहे. दैनंदिन संक्रमण दर ०.४६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.