दोन माजी आमदारांविरुद्ध खाणप्रकरणी गुन्हे नोंद

0
87

विशेष चौकशी पथकाची कारवाई
बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी तपासासाठी गठीत केलेल्या गोवा पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) काल माजी मंत्री ज्योकीम आलेमांव तसेच खाणमालक व माजी आमदार अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
अधिक माहितीनुसार एसआयटीने खनिज नियम १९६०, खाण आणि खनिज (विकास व नियमन) कायदा १९५७ आणि वन (संवर्धन) कायदा १९८० अंतर्गत माजी मंत्री जोकिम आलेमांव व माजी आमदार अनिल साळगावकर व अन्य जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
गोवा खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात विशेष चौकशी पथकाकडे यासंबंधी तक्रार नोंदवली होती. त्याबाबत प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर काल एसआयटीने एफआयआर नोंद केले. या तक्रारीनुसार २००६ ते २०११ दरम्यान, सांगेतील कुर्डी व कुरपे गावात एस. कांतिलाल कंपनीचे संचालक अनिल साळगावकर व कंत्राटदार जोकिम आलेमांव व इतरांनी वैध परवाना, पर्यावरण दाखला व अन्य अनिवार्य परवानगी नसताना बेकायदेशीररित्या खनिज उत्खनन केले होते.
याप्रकरणी डीआयजी के. के. व्यास व अधीक्षक विजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब चौकशी करीत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी विशेष चौकशी पथकाने माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर यांच्यासह ७ जणांना अटक केली आहे.