दोन बसेसच्या कंडक्टर-चालकांच्या हाणामारीमुळे चिखलीत प्रवासी वेठीस

0
107

रेजिना मुंडी बस स्थानकावर काल संध्याकाळी दोन बसगाड्यांच्या चालक व कंडक्टर यांच्यात प्रवासी घेण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. काही वेळ हाणामारी झाल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले व दोन्ही वाहनांच्या चालक-कंडक्टरांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाला पोलीस कोठडीची हवा खावी लागली. हाणामारीत एका बस चालकाच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. या प्रकारामुळे दोन्ही बसेसमधील प्रवाशांना बराच वेळ मनस्ताप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी चिखली-वास्को येथील रेजिना मुंडी बस स्थानकावर एका मडगाव मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी बस व बोगमाळो-वास्को वाहतूक करणारी बस या दोन्ही बसेस एकाच वेळी या बस थांब्यावर पोचल्या. त्यावेळी मडगावहून आलेली साईदीप ही बस पुढे आल्यानंतर बसने प्रवासी उतरवण्यासाठी तेथे थांबा घेतला व त्यातील तीन प्रवासी उतरले. या थांब्यावर असलेले दोन प्रवासी वास्कोला जाण्यासाठी चढले. याचवेळी या बसच्या मागे आलेली बोगमाळो-वास्को ‘रुही’ या बसच्या चालकाने हा प्रकार बघितला व त्याने पुढील बस अडवून मडगावहून आलेल्या बस चालकाला प्रवासी घेतल्याबद्दल जाब विचारला. या कारणावरून या दोन्ही बसमधील चालक व कंडक्टर यांच्यात बाचाबाची झाली. मग त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात मडगाव बसमधील कंडक्टरने बोगमाळो बसमधील चालकाला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. चिखली बस थांब्यावर चालत असलेला हा प्रकार बसमधील प्रवासी व इतर वाहनचालक बघत होते.
दरम्यान, सदर प्रकरण वास्को पोलिसांना कळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या दोन्ही बसमधील चालक व कंडक्टर यांना ताब्यात घेतले. मग संध्याकाळी उशिरा त्यांना येथील उपजिल्हाधिकार्‍यांसमोर उभे केले असता मडगावच्या बसमधील कंडक्टरला जामिनावर सोडण्यात आले. तर बोगमाळो बसमधील चालकाला जामीन न मिळाल्याने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. या दोन्ही बसमधील प्रवाशांना मात्र त्यांच्या भांडणामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.