>> आरोग्यमंत्री ः बालकांचे संसर्गापासून रक्षण
आरोग्य खाते सुमारे २ कोटी रुपये खर्च करून मुलांसाठी न्युमोनिया प्रतिबंधक लसी खरेदी करणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सांगितले. पीसीव्ही-१३ (न्यूमोकोक्कल कॉन्जुगेट व्हॅक्सीन) असे ह्या लसीचे नाव असून मुलांना फुफ्फुसे तसेच रक्त, मेंदू व कानात होणार्या घातक संसर्गापासून ही लस संरक्षण देऊ शकते.
न्युमोकोक्कल हा रोग जंतूंपासून होत असून जगभरात हजारो मुलांना ह्या जंतूंपासून संसर्ग होत असतो व कित्येक मुले त्यामुळे मृत्यूमुखीही पडत असतात. ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना ह्या रोगापासून जास्त धोका असला तरी २ वर्षांपर्यतची मुले ह्या रोगापासून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय प्रौढांनाही ह्या जंतूंपासून संसर्ग होत असतो. ह्या जंतूचा फुफ्फुसात संसर्ग झाल्यास न्युमोनिया होतो. तर मेंदूत संसर्ग झाल्यास मेनीनजायटीस हा रोग होत असतो. ह्या जंतूंवर काही प्रतिजैविकांचाही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने पीसीव्ही-१३ ही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला असून राज्यातील मुलांना मोठ्या संख्येने हे लसीकरण करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. ही लस इंजेक्शनद्वारे देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोव्यात यापूर्वीही हे लसीकरण
आपण यापूर्वी आरोग्यमंत्री होतो तेव्हाही आपण ही लस आणली होती व ती मुलांना देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले होते अशी माहितीही राणे यांनी दिली.
९० प्रकारचे न्युमोकोक्कल जंतू
सध्या ९० प्रकारचे न्युमोकोक्कल जंतू आहेत. तर दोन प्रकारच्या न्युमोकोक्कल लसी आहेत. पीसीव्ही-१३ व पीपीएसव्ही-२३ अशा ह्या लसी आहेत. पीसीव्ही १३ ही १३ प्रकारच्या जंतूसाठीची प्रतिबंधक लस आहे. तर पीसीएसव्ही २३ ही २३ प्रकारच्या जंतूंसाठी. ह्या दोन्ही लसी अमेरिकेत उपलब्ध आहेत. पीसीव्ही १३ ही लस नवजात मुले व बालकांसाठी आहे.