दोन अत्याधुनिक सभागृहे कला अकादमीत उभारणार

0
131

>> अध्यक्ष गोविंद गावडे यांची माहिती

कला अकादमीमध्ये सहाशे व तीनशे आसन व्यवस्था असलेली अत्याधुनिक सोयींनी युक्त दोन समांतर सभागृहे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नवीन सभागृहांसाठी वन खात्याकडून जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री तथा गोवा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी काल दिली.

कला अकादमीच्या हॅरिटेज इमारतीचे सर्ंवधन करणे मोठे आव्हानात्मक काम आहे. मा. दीनानाथ मंगेशकर सभागृह नेहमीच कार्यक्रमानिमित्त व्यस्त असते. लहानसहान कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढत आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्ययावत सभागृहे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. कला अकादमीतील खुल्या थिएटरला नवीन स्वरूप प्राप्त करून दिले जाणार आहे. तसेच ब्लॅक बॉक्स पूर्वपदावर आणण्यात येणार आहे. सध्या ब्लॅक बॉक्सची रयाच गेलेली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

कला अकादमीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अकादमीच्या एकंदर कामकाजात सुसूत्रता आणण्यात येईल. कला अकादमीमध्ये केवळ कलाकार, तंत्रज्ञ कार्यरत राहतील याकडे कटाक्ष असेल. याठिकाणी राजकीय नियुक्तीला थारा दिला जाणार नाही, असेही मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले. कला अकादमीचा ताळगाव पठारावर गोवा विद्यापीठाजवळ भूखंड आहे. तिथे गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था उभारण्यावर विचार केला जाणार आहे. कांपाल येथील कला अकादमीच्या जागेचे महत्त्व अबाधित आहे. या ठिकाणी रस्ता, किनारा व इतर खात्याच्या जमिनी असल्याने जागेचा प्रश्‍न निर्माण होतो, असेही मंत्री गावडे म्हणाले.

कला अकादमीच्या माध्यमातून दर्जेदार कलाकार निर्माण झाले पाहिजेत. या उद्देशाने संगीत, नाट्य, नृत्य यांसाठी गुरुकुल पद्धतीची शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याचा विचार आहे. याठिकाणी विविध क्षेत्रांतील चांगले गुरुजन आणण्याची तयारी आहे. तसेच विद्यार्थ्यांना निवास व इतर सुविधा उपलब्ध करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच वर्षे राहून शिक्षण घेतले पाहिजे. कला ही केवळ छंद म्हणून नव्हे तर कलेचे संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. राज्यात दर्जेदार कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने कला अकादमीची स्थापना करण्यात आली. परंतु, आजची स्थिती वेगळीच आहे. कला अकादमी केवळ मनोरंजनाचे केंद्र बनली आहे. कला अकादमी हे केवळ मनोरंजनाचे स्थान नाही हा लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

‘मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट’साठी प्रयत्न
मास्टर इन परफॉर्मिंग आर्टला गोवा विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या विषयावर तोडगा काढण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यासाठी मनोरंजन संस्था किंवा कुठ्ठाळी येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या कला भवनात व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.