दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही ः डॉ. बादेकर

0
57

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या को-मॉर्बिड दोन रुग्णांचे इतर आजाराने निधन झाले आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

गोमेकॉत २३० व्हेन्टिलेटरची गरज
गोमेकॉमध्ये सुमारे २३० रुग्णांना व्हेन्टिलेटरची गरज आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर को-मॉर्बिड रुग्णांनी त्वरित इस्पितळांत दाखल होऊन उपचार सुरू केले पाहिजेत. शेवटच्या टप्प्यात इस्पितळांत आल्यानंतर उपचार करणे कठीण होऊन बसते, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

गोमेकॉमध्ये नवीन डॉक्टरांची नियुक्ती येत्या दोन -तीन दिवसांत केली जाणार आहे. डॉक्टरांच्या नियुक्तीची फाईल लालफितीत अडकलेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नवनवीन कोविड विभाग जाहीर केले जात आहेत. तेथे काम करण्यासाठी मोठ्या संख्येने डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची गरज आहे.
डॉक्टरांची संख्या कमी असल्याने त्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटासाठी मेच्या
तिसर्‍या आठवड्यात लस

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी पाच लाख लशींची ऑर्डर देण्यात आली आहे. या कोरोना लशीचा त्वरित पुरवठा व्हावा म्हणून रक्कमसुध्दा आगाऊ देण्यात आली आहे. तथापि, देशभरातून लशीसाठी वाढत्या मागणीमुळे लशीचा पुरवठा होऊ शकलेला नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून लस मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यानंतर लस मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांकडून कोरोनाबाधित को-मॉर्बिड रुग्णांना औषधांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, प्रकृतीत वेळीच सुधारणा न होणार्‍या कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे, असे आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा यांनी सांगितले.