दोनापावलच्या इफ्फी कन्वेंशन सेंटर बांधकामातून इडीसीची माघार

0
122

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) दोनापावल येथील नियोजित कन्वेंशन सेंटरच्या बांधकामातून माघार घेण्याचा निर्णय आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्य सरकारने दोनापावल येथे आयटी प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या सुमारे २ लाख चौरस मीटर जागेत इफ्फीसाठी कायम स्वरूपी साधन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ईडीसीची नियोजित कन्वेंशन सेंटरच्या उभारणीच्या कामासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ईडीसीने कन्वेंशन सेंटर उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी निविदा जारी केली होती. कन्वेशन सेंटरसाठी दोन टप्प्प्यात आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामावर आत्तापर्यंत १ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत कन्वेशन सेंटर उभारण्याच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. या कन्वेंशन सेंटरच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. तसेच, गोवा मनोरंजन संस्थेकडून या सेंटरचा वापर केला जाणार आहेत. त्यामुळे कन्वेंशन सेंटरचे काम माहिती व प्रसिद्धी खात्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.