दोडामार्ग स्थानकावर शुकशुकाट

0
123

एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने दोडामार्ग बस स्थानकावर शुकशुकाट होता. दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी परतणार्‍या प्रवाशांसह दोडामार्ग बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले लोक बसेस नसल्याने अडकून पडले होते.

एसटी संपामुळे खाजगी वाहन चालकांनी भरपूर कमाई केली. गोव्यातील कदंब महामंडळाच्या बसगाड्या दोडामार्गपर्यंत वाहतूक करीत होत्या. मात्र, पुढे बसेस नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे भरमसाठ पैसे मोजून प्रवाशांना खाजगी बसद्वारे जावे लागले होते. कोल्हापूर, बेळगाव येथील प्रवाशांना खाजगी वाहन करून जावे लागल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

एसटी संपामुळे बाजारपेठेत व्यवहार पूर्णपणे थंडावले होते. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्री वस्तीला आलेल्या बसेस सावंतवाडी डेपोत होत्या तर कोल्हापूर बसेस प्रवासी न घेता डेपोत गेल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारलेल्या संपाची माहिती नसल्याने गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले अनेक प्रवासी अडकून पडले. कदंब बसेस दोडामार्ग बस स्थानकात उभ्या केल्या होत्या. त्या ग्रामीण भागात न गेल्याने बाजारात दिवाळी साहित्य खरेदीसाठी आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.