हणजुण, म्हापसा तसेच कळंगुट परिसरात घरफोड्या, वाहने, सोनसाखळ्या तसेच इतर सामानाच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका यशस्वी कारवाईत नेरुल येथील कृष्णा सुनंदराज दिवीनिंग (वय २०) व सावतावाडो, बागा – कळंगुट येथील शंकर दशरथ माळी (वय २०) या दोघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या या सराईत चोरट्यांनी तीन घरफोड्या, पाच कारगाड्या तसेच ६ सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात हणजुण भागात दोन, तर म्हापशात एक घरफोड्या, हणजुण येथे २, म्हापशात १ तर पणजी व पर्वरी येथून प्रत्येकी १ कारगाडी पळविल्याचे निष्पन्न झाले आहे. या चोरट्यांनी कळंगुट भागातून पाच तर म्हापशातून एक सोनसाखळी चोरल्याची कबुलीही दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चोरटे घरफोड्यांसाठी गॅसकटरचा वापर करीत होते. कारगाड्या पळविण्यासाठी नकली चाव्या तर मोटारसायकलींच्या मदतीने सोनसाखळ्या पळवीत होते. चोर्या करण्यासाठी वापरण्यात येणारी मारुती स्वीफ्ट कार तसेच गॅस कटर, हातोडा जप्त करण्यात आला आहे. अन्य मालांत ४ दुचाक्या, मायक्रोमॅक्स, नोकिया, सॅनसुई, कार्बन, सॅमसंग बनावटीचे ३० मोबाइल, ३ होम थिएटर, मोबाइल रिचार्ज व्हाउचर्स, सीम कार्डे, गॅस सिलिंडर्स, गॅस शेगड्या तसेच कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. कपड्यांमध्ये ३० जीन्स पँटचा समावेश आहे.
उत्तर गोव्याचे अधीक्षक उमेश गावकर व उपअधीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या चोरट्यांना पकडण्यात हणजुण स्थानकाचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, तुषार वेर्णेकर, उपनिरीक्षक महेश केरकर, कवळेकर, दत्तप्रसाद नानोडकर, राघोबा कामत, साहाय्यक उपनिरीक्षक प्रमेश नाईक, हवालदार उमेश पावसकर, शिपाई रावजी शेट्ये, रुपेश कोरगावकर, अजय कोरगावकर, सुहास जोशी, तीर्थराज म्हामल व आल्वितो डिमेलो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.