देसाई, फडके, मुल्ला यांना अटक

0
110

>>जीसीएतील घोटाळा प्रकरण; आर्थिक गुन्हेविरोधी पोलिसांची कारवाई

 

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या गोवा क्रिकेट संघटनेतील ३ कोटी १३ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांना काल अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे विरोधी विभागाने (इओसी) ही कारवाई केली. वरील त्रिकुटाच्या अटकेमुळे क्रीडा वर्तुळात खळबळ माजली आहे.

जीसीएतील आर्थिक घोटाळा प्रकरणी वरील पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे आर्थिक गुन्हे विरोधी विभागाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये फेरफार, पैशांचा गैरवापर व फसवणूक आदी आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली
आहे.
भा. दं. सं. कलम ४०८, ४९०, ४६३, ४६४, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) खाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघाही संशयितांची अटकेनंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
तक्रारीमुळे घोटाळा उघड
या महिन्याच्या प्रारंभी पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे विरोधी विभागाने जीसीएतील घोटाळा प्रकरणी अध्यक्ष चेतन देसाई, सचिव बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. जीसीएचे आजीवन सदस्य असलेले विलास गावस देसाई यांनी जीसीएतील घोटाळ्याला वाचा फोडत गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांनी अज्ञाताच्या विरोधात जीसीएच्या नावे बँकेत बोगस खाते उघडून निधी लुटल्याची पोलीस तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत चौकशीनंतर वरील तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर संशयितांची कसून चौकशी सुरू होती. जीसीएच्या निधीची अफरातफर करण्यासाठी बोगस खाते उघडलेल्या संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांच्या जबान्या मंगळवारी घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर सबळ पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी तिघाही वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक केली.

३ कोटी १३ लाखांचा घोटाळा
चेतन देसाई, सचिव विनोद फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांनी २००६ व २००८ या दरम्यान दोनवेळा आर्थिक घोटाळा केला असल्याची तक्रार आहे. जीसीएचे पूर्वअध्यक्ष दयानंद नार्वेकर यांच्या कार्यकाळात चेतन देसाई सचिव व विनोद फडके खजिनदार असताना हे घोटाळे झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिला घोटाळा २००७ साली झाल्याचा आरोप आहे. वरील तिघांनी गोवा क्रिकेट असोसिएशनची बनावट कागदपत्रे व ठराव यांचा वापर करून डेव्हलपमेंट क्रेडीट बँकेच्या पणजी शाखेत जीसीएच्या नावे बोगस खाते उघडले व बीसीसीआयने गोव्यात झालेल्या एक दिवशीय क्रिकेट सामन्यातील दूरदर्शन प्रक्षेपणाचा दिलेला २.८७ कोटींचा हिस्सा हडप केल्याची तक्रार आहे. दुसर्‍या घोटाळ्यात मैदानाचे काम करणार्‍या हाको एंटरप्राइझेसला पैसे देणे असल्याचे कारण पुढे करून जीसीएच्या खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आले होते. १८ लाख व ८ लाख असे काढण्यात आलेले दोन धनादेश कंपनीला मिळालेच नसल्याने घोटाळा उघड झाला आहे.