कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेतही चर्चेला आला. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडी स्टुडिओचे कर्ज आणि त्याबाबतच्या गोष्टींची सखोल चौकशी केली जाईल, असे काल विधानसभेत स्पष्ट केले.
ही गोष्ट खरी आहे, की त्यांच्यावर कर्ज होते. स्टुडिओ गहाण ठेवला होता, निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते; परंतु कुठे जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला का? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का? याची सखोल चौकशी सरकार करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
शवविच्छेदन अहवाल हाती
कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केलेल्या कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण गळफास असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.
नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या देहाचे शवविच्छेदन बुधवारी जेजे रुग्णालयात चार डॉक्टरांच्या पथकाने केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण गळफास असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.
आज होणार अंत्यसंस्कार
नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओ परिसरातच अंत्यसंस्कार होतील. त्यांची मुलगी व जावई परदेशातून भारतात परतले असून, शुक्रवारी दुपारनंतर देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.