देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असावी

0
8

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी; लाल किल्ल्यावर 78वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

काल देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर 103 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता (सेक्यूलर सिव्हिल कोड) लागू करण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनेकवेळा समान नागरी कायद्यावर चर्चा केलेली आहे. अनेकवेळा याबाबत आदेश दिला आहे. ज्या नागरी कायद्याला घेऊन आपण जगत आहोत, तो एका प्रकारे सांप्रदायिक कायदा आहे. हा भेदभाव करणारा कायदा आहे. आज आपण संविधानाची 75 वर्षे साजरे करत आहोत. संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले.

जे कायदे धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करतात, जे कायदे उच्च-नीचतेचे कारण बनतात, अशा कायद्यांना आधुनिक समाजात कोणतेही स्थान नाही. त्यासाठीच धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असायला हवी, अशी देशाची मागणी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

एक देश, एक निवडणूक
देशात आता एक देश एक निवडणूक धोरण राबवणे गरजेचे आहे. तसेच राजकारणातील घराणेशाही नष्ट करणे गरजेचे असल्याचेही मोदी म्हणाले.

1 लाख तरुण-तरुणींनी राजकारणात यावे : मोदी

देशभरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुण-तरुणींनी पुढे यावे आणि राजकारणात सक्रिय व्हावे. त्यांनी कोणत्याही पक्षात जावे; पण राजकारणात यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.